Nagpur | जन्म झाल्यावर सोळाव्या दिवशीच तान्हुलीचे छत्र हरविले, वडिलांचा मृत्यू
By जितेंद्र ढवळे | Published: December 21, 2022 08:47 PM2022-12-21T20:47:00+5:302022-12-21T20:50:41+5:30
पतीच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच मायमाउलीला घराबाहेर हाकलले, कुटुंबीयांकडून छळ
भिवापूर: दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. २० दिवसांपूर्वी गोंडस मुलगी झाली. मात्र त्यावर वडिलांचे छत्र केवळ सोळाच दिवस राहिले. दुचाकी अपघातात तान्हुलीचे छत्र हिरविले गेले. हाती सोळा दिवसाची तान्हुली अन् नवऱ्याचे पार्थिव घेऊन मायमाउली घरी परतली. पतीच्या अंत्यसंस्कार नंतर कुटुंबीयांनी तिला तान्हुलीसह हाकलून लावले. तेव्हापासून ही २० वर्षाची मायमाउली आपल्या तान्हुलीला घेत न्यायासाठी धडपडत आहे. मात्र माणुसकीच मेली की काय ? कुणीच तिचे गाऱ्हाने गांभीर्याने घेताना दिसत नाही!
साक्षी स्वप्नील दुपारे (२०) रा. सालेभट्टी (पुनर्वसन) असे अल्पवयात विधवा ठरलेल्या माउलीचे नाव आहे. नागपूरची असलेल्या साक्षीचे तालुक्यातील सालेभट्टी (पुनर्वसन) येथील स्वप्नील दुपारे याच्याशी जून २०२१ मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत प्रेमविवाह झाला. तेव्हापासून साक्षी व स्वप्नील सालेभट्टी येथील घरी कुटुंबापासून वेगळे राहत होते. यादरम्यान कौटुंबिक भांडणाच्या पोलिस तक्रारी सुध्दा झाल्यात. अशातच गत ३० नोव्हेंबर रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात साक्षीने गोंडस मुलीला जन्म दिली. डिलेव्हरी झाल्याने साक्षी बाळासह काही दिवसांसाठी नागपूरला आई-वडिलांकडे गेली. दरम्यान कौटुंबिक भांडणाच्या दाखल प्रकरणात १२ डिसेंबर रोजी तारीख असल्याने स्वप्नील हा दुचाकीने भिवापूरला आला होता. रात्री नागपूरला परत जाताना चक्री घाट परिसरात त्याचा अपघात झाला. नागपूर मेडिकलमध्ये उपचारादरम्यान १४ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. २० वर्षीची साक्षीच्या कपाळावरील कुंकू पुसल्या गेले तर अवघ्या १६ दिवसाच्या तान्हुलीचे पितृछत्र हरविले. डोळ्यात अश्रू अन् कडेवर तान्हुलीला घेऊन ती पतीच्या मृतदेहासह गावात परतली. पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तासाभरातच स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी साक्षीला तान्हुलीसह हाकलवून लावले. कुटुंबीयांनी साक्षीचा छळ सुरू केला. मग गावातच तिने कुणाकडे तरी एक रात्र घालविली. घराची चाबी, कागदपत्र, पैसे अशा कुठल्याच वस्तूचा कुठेच थांगपत्ता नसल्याने साक्षीने पोलिस स्टेशन गाठले. अदखल पात्र गुन्ह्याची नोंद झाली. मात्र व्यथा, वेदणांसह नियतीने मांडलेल्या छळाशी लढा देत असलेली साक्षी अद्यापही घराबाहेरच आहे. यासंदर्भात स्थानिक पत्रकारांनी ठाणेदार महेश भोरटेकर यांची भेट घेत, याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करून साक्षीला न्याय देण्याची भूमिका व्यक्त केली.
तान्हुली आजारी
वडिलांचे छत्र हरविले तेव्हा अवघ्या सोळा दिवसाची असलेली तान्हुली आता पाच दिवसांनी मोठी झाली आहे. तिच्या प्रकृतीची तपासणी केली असता डॉक्टरांनी एक आजार असल्याचे सांगितले. त्यामुळे नागपूर मेडिकलमध्ये तिची पुन्हा तपासणी करण्यात आली.
मृत्यूपूर्वी स्वप्नीलने तान्हुलीच्या औषधोपचारासाठी काही रक्कम व अत्यावश्यक कागदपत्र घरातील एका पिशवीत ठेवले होते. मात्र स्वप्नीलच्या मृत्यू पश्चात राहत्या घराची चाबी, रोख रक्कम, कागदपत्र यापैकी काहीच साक्षीला मिळाले नाही. स्वप्नीलच्या कुटुंबीयांना बुधवारी (दि.२१) पोलिस स्टेशनला बोलावून विचारणा केली असता, अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहासोबत कागदपत्राची पिशवी सुध्दा जळाल्याचे त्यांनी सांगितले.