नागपुरात एकाला जन्मठेप, तिघांना १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:21 AM2018-04-04T01:21:29+5:302018-04-04T01:21:39+5:30
विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे संघटित गुन्हेगारीला जोरदार दणका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे संघटित गुन्हेगारीला जोरदार दणका बसला आहे.
दीपक अनिल आवळे (३०), सुनीता किशोर कुलकर ऊर्फ सुनीता दीपक आवळे (३०), पुष्पा उमाशंकर निखारे (४५) व राजा ऊर्फ सुमित वासुदेव फुलझेले (२८), अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी प्रमुख आरोपी दीपकला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने या चारही आरोपींना भादंविच्या कलम ३४२, ३६३, ३८६, ४२०, १२०-ब व मोक्का कायद्याच्या कलम ३(१)(कक), ३(२), ३(४) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.
असे आहे प्रकरण
सिद्धार्थ खोब्रागडे असे फिर्यादीचे नाव असून, ते जरीपटका येथील रहिवासी आहेत. तक्रारीनुसार, मार्च-२०१६ मध्ये खोब्रागडेंना आरती जयस्वाल नावाच्या महिलेचा फोन आला. त्यानंतर ती वारंवार फोन करीत होती. त्यामुळे खोब्रागडे व तिची फोनवर मैत्री झाली. त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. वारंवार भेटल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. खोब्रागडेंनी तिला लग्नाची मागणी घातली. महिलेने लग्नासाठी होकार दिला. दरम्यान, त्यांनी काहीवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एक दिवस आरोपींनी दोघांनाही एका खोलीत पकडले व बलात्काराची तक्रार नोंदविण्याची धमकी देऊन खोब्रागडेंकडून लाखो रुपये उकळले. आरोपी याच पद्धतीने श्रीमंत व्यक्तींना हेरून व त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून मोठमोठी रक्कम उकळीत होते. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.