जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक
By दयानंद पाईकराव | Published: June 23, 2024 05:35 PM2024-06-23T17:35:36+5:302024-06-23T17:36:20+5:30
जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूर : मिहानमध्ये जॉबसाठी जात असताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने धडक दिल्यामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
सागर शामकुमार पाटील (२३, रा. दुर्गा सोसायटी, नाग मंदिराजवळ कामठी) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मिहानमध्ये जॉब करीत होता. शामकुमार पाटील यांना जुळे मुले होते. त्यातील सागर हा शनिवारी २२ जून २०२४ रोजी दुपारी ४ वाजता आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, सी. बी-८२९४ ने मिहान येथे जॉबसाठी जात होता. नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राज रॉयल लॉनच्या मागे, स्मशान घाटाच्या टर्निंगवर दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, सी. व्ही-४४२९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून सागरच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात सागर गंभीर जखमी झाला. सागरला नागरिकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ८.२० वाजता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. सागरच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आपला जुळा भाऊ गेल्याचे पाहून त्याच्या भावाने हंबरडा फोडला. सागरचे वडिल शामकुमार धनिराम पाटील (५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन यादव यांनी आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.