Nagpur: गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान
By सुमेध वाघमार | Published: August 4, 2023 06:44 PM2023-08-04T18:44:17+5:302023-08-04T18:45:12+5:30
Organ donation: अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे.
- सुमेध वाघमारे
नागपूर - अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे. नातेवाइकांच्या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे शुक्रवारी दोन्ही मूत्रपिंड दान होऊन दोघांना जीवनदान मिळाले.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरड येथील मंदाबाई ठाकरे (५५) त्या अवयव दाताचे नाव. मंदाबाई शेत मजूर होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना बरे वाटत नसल्याने जवळच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. परंतु प्रकृती खालवत असल्याचे पाहून नातेवाइकांनी त्यांना १४ जुलै रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. येथे ‘ब्रेन ट्युमर’ असल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना एम्सचे डॉ.उदित नारंग, डॉ.ओमशुभम असई, डॉ. वरिध कटियार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनिष श्रीगिरीवार व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम या पथकाने मंदाबाईला तपासून त्यांचा ‘मेंदू मृत’ (ब्रेन डेड) झाल्याची घोषणा केली. त्यांचा नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशनही केले.
आपल्या माणसाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा हा सल्ला नातेवाइकांना पटला. मंदाबाई यांचे भाऊ दादाजी राऊत, हिरामण राऊत व नत्थुजी राऊत यांनी अवयवदानाला होकार दिला. याची माहिती, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. नियमानुसार दोन्ही किडनी गरजू रुग्णांना दान करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने ते थांबविण्यात आले.