वर्ल्ड कपच्या मैदानातून नागपूर आऊट! क्रिकेटप्रेमींचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 02:04 PM2023-06-28T14:04:38+5:302023-06-28T14:06:43+5:30
विश्वचषक आयोजनात व्हीसीएकडे दुर्लक्ष
राम ठाकूर
नागपूर : कारण कुठलेही असो मात्र, सत्य हेच की. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपूरला देण्यात आलेला नाही. यामुळे केवळ नागपूरकर नव्हे, तर विदर्भातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे.
मंगळवारी सकाळी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच, व्हीसीएला एकाही सामन्याचे यजमानपद देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. क्रीडा रसिकांची घोर निराशा झाली.
१९८७ साली भारताने पहिल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषविले. त्यावेळी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सामना झाला होता. त्या सामन्यात चेतन शर्माने गोलंदाजीत हॅट् ट्रिक घेतली, तर महान सुनील गावसकर यांनी वन डेत एकमेव शतक झळकावून हा सामना अविस्मरणीय ठरविला होता. यानंतर, १९९६ आणि २०११ला भारताच्या यजमानपदाखाली विश्वचषकाचे आयोजन झाले, तेव्हाही नागपूरला सामन्यांचे आयोजन झाले होते.
२०१६ च्या टी-२० विश्वचषकात तर जामठा मैदानावर महिला आणि पुरुष संघांचे सराव सामने आयोजित करण्यात आलेच, शिवाय मुख्य सामन्यांसह जवळपास १२ लढती येथे खेळविण्यात आल्या होत्या. त्यात भारत- न्यूझीलंड या पुरुषांच्या सामन्यांचाही समावेश होता.
मुंबई, पुण्याच्या पलीकडे बघा, विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवा; अनिल देशमुखांची BCCIला विनंती
२०२३ च्या वन डे विश्वचषकातील एकही सामना नागपूरला न दिल्याबद्दल व्हीसीए पदाधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. व्हीसीएचे अध्यक्ष न्या. विनय देशपांडे लोकमतशी बोलताना म्हणाले, 'नागपूरला यजमानपदापासून वंचित ठेवणे विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी दुःखाची बाब ठरावी.' मुलासोबत कॅनडात असलेले देशपांडे यांनी जामठा स्टेडियम अत्याधुनिक सुविधायुक्त असल्यानंतरही सामने आयोजनापासून दूर ठेवल्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, 'विश्वचषकासारख्या आयोजन स्थळांबाबत अंतिम निर्णय आयसीसी घेते. त्यामुळे खरे कारण काय असावे, हे सांगता येणार नाही, पण एक खरे की, व्हीसीएचे पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेट चाहत्यांवर हा मोठा आघात आहे.
अहमदाबाद क्रिकेटची नवी राजधानी!
- विश्वचषक सामना आयोजनातून डावलण्यात आल्यानंतर व्हीसीएसोबतच अनेक राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या कार्यकारिणीला धारेवर धरले. त्रिवेंद्रमला वगळण्यात आल्याने खा. शशी थरूर यांनी अहमदाबाद क्रिकेटची नवी राजधानी झाल्याचा आरोप करीत सचिव जय शाह यांच्यावर नेम साधला.
- मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी इंदूरला वगळल्याबद्दल तर पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीतसिंग मीत यांनी मोहालीकडे डोळेझाक केल्याबद्दल संताप व्यक्त केला. राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करीत त्यांनी बीसीसीआयचे नेतृत्व कोणाकडे आहे, हे सर्वांना ठाऊक असल्याचे म्हटले आहे.
व्हीसीए पदाधिकाऱ्यांची नाराजी
व्हीसीएचे सचिव संजय बडकस यांच्यामते, केवळ नागपूर नव्हे, तर मोहाली, इंदूर, राजकोट, रांची यांसारख्या शहरांना विश्वचषक आयोजनापासून दूर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयला आता जाब विचारण्यात अर्थ नाही, कारण वेळापत्रकावर अंतिम निर्णय झाला आहे. नागपूरला आयोजनापासून वंचित ठेवणे हा या क्षेत्रातील क्रिकेट चाहत्यांवर अन्याय आहे. टीव्हीवर सामने पाहू शकतो. मात्र, मैदानात उपस्थित राहून सामना पाहण्याची वेगळी मजा असते. युवा क्रिकेट चाहते निराश आहेत. व्हीसीएचे माजी अध्यक्ष अद्वैत मनोहर यांनीही अध्यक्ष आणि सचिवाच्या मतांशी सहमती दर्शवित नागपूरला यजमानपदापासून दूर ठेवणे निराशादायी असल्याचे सांगितले. आयोजन स्थळांचा निर्णय बीसीसीआय आणि आयसीसीने घेतला, त्यामुळे आता काहीही होऊ शकणार नाही.