Nagpur: किन्नराच्या हैदोसानंतर दहशत, रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा; थेट पंतप्रधानांना पत्र
By नरेश डोंगरे | Published: January 6, 2024 07:12 PM2024-01-06T19:12:15+5:302024-01-06T19:12:58+5:30
Nagpur News: पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे.
- नरेश डोंगरे
नागपूर - पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय त्यांच्यासमोर मांडला आहे.
पुण्याहून नागपूर मार्गे हटियाकडे निघालेल्या रेल्वे गाडीच्या जनरल कोचमध्ये शिरून सहा किन्नरांनी लुटमार केली होती. पैशासाठी त्यांनी त्यावेळी अनेकांना वेठीस धरले होते आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर तसेच अन्य प्रवाशांसमोर अपमाण करून मारहाणही केली होती. या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र, त्यांची संख्या फार तर चार किंवा पाच एवढीच असते. ते जवान एसी कोचमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हा भाग लक्षात घेऊन भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंकुमार शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला असून रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या विषयाचे मुद्दे मांडले आहे. आउटरवर (निर्जन ठिकाणी) गाडी थांबवू नये, रेल्वे स्थानकावरच डब्याचे दार उघडावे, प्रवाशांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाडीत सुरक्षेसाठी जे तैनात आहे, अशा जवानांचे मोबाईल प्रत्येक डब्यात लिहिले जावे, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
एका डब्यात दोन गार्ड असावे
प्रत्येक डब्यात किमान दोन गार्ड प्रवाशांच्या सुरक्षेत तैनात असल्यास गुन्हेगारी करणारे, किन्नर तसेच अन्य समाजकंटकावर वचक राहिल आणि प्रवाशांच्या जानमालास समाजकंटकाकडून धोका होणार नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.