नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:08 PM2018-04-14T23:08:22+5:302018-04-14T23:08:33+5:30

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली.

Nagpur: Pantry car gave less food, no menu card available | नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

Next
ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’कडे करणार तक्रारनागपुरात ‘सिनिअर डीसीएम’ची अकस्मात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाडीच्या पेन्ट्रीकारमध्ये ठराविक वजनापेक्षा कमी वजनाचे भोजन पुरविण्यात येत असल्याची तक्रार नेहमीच रेल्वेचे प्रवासी करतात. पेन्ट्रीकारमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो, कर्मचाऱ्यांजवळ मेन्यूकार्ड नसते अशीही ओरड होते. परंतु रेल्वे प्रशासनावर या तक्रारींचा कोणताच परिणाम होत नाही. प्रवाशांची ही धारणा बदलविण्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली. याबाबत ते आयआरसीटीसीकडे तक्रार करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दपूम रेल्वेचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी १३ एप्रिलला रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ गीतांजली एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान अचानक पेन्ट्रीकारचे निरीक्षण केले. त्यांनी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इतर प्रवासी सुविधांसह खाद्यपदार्थ, भोजनाचा तसेच नाश्त्याचा दर्जा, वजन आदींची तपासणी केली. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळल्या. तपासणीत त्यांना पेन्ट्रीकारमध्ये समाधानकारक स्वच्छता दिसली नाही. पेन्ट्रीकार कर्मचाºयांजवळ मेन्यूकार्ड नव्हते. जनता खाना नव्हते. भोजन दिल्यानंतर बिल देण्याची व्यवस्था नव्हती. पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वजनाऐवजी कमी वजनाचे भोजन, नाश्ता देणे आणि त्यासाठी अधिक रक्कम वसूल करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची चांगलीच खरडपट्टी काढली. याबाबत ते ‘आयआरसीटीसी’कडे तक्रार करणार आहेत.

प्रवाशांनी तक्रार करावी
दपूम रेल्वे नागपूर विभागाच्या वाणिज्य विभागाने प्रवाशांना रेल्वे हेल्पलाईनच्या माध्यमातून अशा असुविधांबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती देऊन प्रवासी सेवांचा दर्जा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वाणिज्य कर्मचाऱ्यांना सल्ला
भविष्यात रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि पौष्टिक आहार ठरवून दिलेल्या दरानुसार उपलब्ध करून देण्याच्या सूचना वाणिज्य विभागाच्या अधिकारी व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या. सोबतच त्यांना रेल्वे सुविधांचा दर्जा टिकून राहावा यासाठी पेन्ट्रीकारसह इतर प्रवासी सुविधांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.

‘आयआरसीटीसी’ला देणार अहवाल
‘गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमधील आकस्मिक पाहणीदरम्यान अनेक त्रुटी आढळल्या. पेन्ट्रीकारचे कंत्राट आयआरसीटीसीकडून देण्यात येते. त्यामुळे रेल्वेगाड्यात पुरविण्यात प्रवासी सुविधात त्रुटी राहू नये यासाठी संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी लवकरच याबाबतचा अहवाल छायाचित्रासह ‘आयआरसीटीसी’ला सोपविणार आहोत.
- आशुतोष श्रीवास्तव, ‘सिनियर डीसीएम’, दपूम रेल्वे, नागपूर विभाग
 

Web Title: Nagpur: Pantry car gave less food, no menu card available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.