ई-पंचनाम्याचा नागपूर पॅटर्न, शेतीच्या नुकसानीची मिळते अचूक माहिती
By जितेंद्र ढवळे | Published: September 14, 2023 04:48 PM2023-09-14T16:48:29+5:302023-09-14T16:51:57+5:30
सरकारला अहवाल सादर : जिल्ह्यात १ हजार १८५ हेक्टर क्षेत्र बाधित
नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि गतीने पंचनामे व्हावे यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेला ई-पंचनाम्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यावर्षी जून ते जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचे ई-पंचनामे करुन राज्य सादर करण्यात आले आहेत. या प्रयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी दिली.
महसूल सप्ताहानिमित्त नागपूर विभागात ‘ई पंचनामे’ हा प्रयोग प्रथमच राबविण्यात आला होता. नागपूरसह विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे या प्रयोगाच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. मोबाईल अप्लीकेशन व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी नुकसानी संदर्भातील माहिती व छायाचित्र अपलोड केले. यानंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत केवळ दहा दिवसात अचूक माहिती सरकारला सादर करणे शक्य झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर जिल्ह्याची माहिती विभागीय आयुक्त यांना या सॉफ्टवेअरमार्फत सादर केल्यानंतर केवळ पाच मिनिटात ही माहिती शासनाला सादर करणे सुलभ झाले बिदरी यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात कोरडवाहू, बागायत तसेच फळ पिकाखालील क्षेत्रापैकी १ हजार १८५.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ हजार ४८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे ७३ हजार १६० हेक्टर क्षेत्र बाधित
नागपूर विभागात जुन व जुलै या कालावधीत अतिवृष्टीमुळे ७३ हजार १६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात १ लाख १ हजार ७६ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. झालेल्या नुकसानीसाठी ६३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.