नागपूर पवनकर कुटुंब हत्याकांड; क्रूरकर्म्याने करून दाखवले प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:32 AM2018-06-25T10:32:07+5:302018-06-25T10:33:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या थरारक हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला घटनास्थळी नेऊन रविवारी पहाटे पोलिसांनी त्याच्याकडून हत्याकांडाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
१० जूनच्या मध्यरात्रीनंतर नंदनवनच्या आराधनानगरात क्रूर पालटकरने स्वत:च्या मुलासह, सख्ख्या बहिणीचे कुटुंब संपवले. ११ जूनच्या भल्या सकाळी हे पाच जणांचे थरारक हत्याकांड उघडकीस आले. तत्पूर्वीच पालटकर फरार झाला. पोलीस ठिकठिकाणी या नराधमाचा शोध घेत होते. तो पंजाबमधील लुधियानात दडून बसला होता. अखेर २१ जूनला पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. २२ जूनला सायंकाळी नागपुरात आणल्यानंतर २३ जूनला त्याला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३० जूनपर्यंत पीसीआर मिळवला. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून हत्याकांड कसे केले, कसा येथून पळाला, त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर त्याला मृत कमलाकर पवनकरच्या घरी नेले. तेथे पहाटेपर्यंत पोलिसांनी त्याच्याकडून हत्याकांडाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
बरेचदा पोलीस हत्याकांडाच्या प्रकरणात आरोपीकडून दिवसा प्रात्यक्षिक करून घेतात. मात्र, या क्रूरकर्म्याने घडविलेले आक्रित आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात धगधगत असलेला असंतोष लक्षात घेता या क्रूरकर्म्याचा अक्कू यादव होऊ शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी दुपारी प्रात्यक्षिक करून घेण्याचे टाळले. शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून घेतल्यानंतर नंदनवन पोलिसांचा ताफा क्रूरकर्मा विवेक पालटकरला घेऊन कमलाकर पवनकरच्या घरी पोहचला. तेथे त्याने घरात कशा प्रकारे प्रवेश मिळवला. तो कुठे झोपला, मृत पाच जण कुठे झोपले होते. त्याने सब्बल कशी घरात आणली, कशी हत्या केली आणि दार बंद असताना तो तेथून कसा पळून गेला, त्याचे पोलिसांनी प्रात्यक्षिक करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ठाण्यात नेले. तेथे पुन्हा त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.