नागपूर पवनकर हत्याकांड: मितालीचा अखेरचा आधारही हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:08 PM2018-06-11T16:08:58+5:302018-06-11T16:09:07+5:30
नागपुरातील पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे. चार वर्षापूर्वी बापाने तिच्या आईची हत्या केली होती. त्यामुळे लहान भाऊ व मिताली मामाच्या आसऱ्याने नागपूरला राहत होते. मात्र रविवारच्या मध्यरात्री क्रूरकर्म्याने हा शेवटचा आधारही हिरावून घेतला. आज घटनेनंतर जमलेल्या नातेवाईकांच्या गराड्यात मिताली एकटी पडली होती.
दिघोरी परिसरातील आराधनानगरात घडलेल्या पवनकर कुटुंबियांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या हत्याकांडात दोन मुली केवळ बचावल्या आहेत. यातील एक मृतक कमलाकर पवनकर यांची मुलगी वैष्णवी तर दुसरी आरोपीची स्वत:ची मुलगी मिताली आहे. आरोपी हा कमलाकर पवनकर यांचा साळा होता. आरोपी विवेक याचा स्वभाव विक्षिप्त स्वभावाचा होता. त्याने कशाचाही विचार न करता २०१४ मध्ये पत्नीचाही खून करून दोन मुलांना उघड्यावर सोडले होते. आईचा मृत्यू आणि बाप कारागृहात त्यामुळे पोरके झालेल्या मिताली व तिचा भाऊ क्रिष्णा यांना कुणीही जवळ केले नाही. अशावेळी कमलाकर व अर्चना यांनी या मुलांना आधार दिला त्यांना माया लावली. या आधारावर दोघेही भावंड चांगले आयुष्य जगत होते. कृष्णा तर अर्चना व कमलाकर यांना आई-वडील म्हणत होता. कमलाकरने मुलांचे संगोपन तर केलेच, शिवाय विवेकाला कारागृहातून सोडवून आणण्यातही मदत केली. पण या राक्षसी प्रवृत्तीच्या विवेकला ना उपकाराची जाण होती, ना मुलांबद्दलही कुठलीच भावना.
इतक्या निर्दयीपणे कुणी शत्रुलाही मारू नये, अशा विक्षिप्तपणाने त्याने स्वत:च्या बहिणीच्या कुटुंबाचा घात केला. यात त्याने स्वत:च्या पोरालाही संपविले. मिताली मात्र वैष्णवीसोबत वेगळी झोपली असल्याने त्याच्या क्रौर्यापासून बचावली. आधी आईपासून आणि आता मामाच्या आसऱ्यापासून मिताली पोरकी झाली.
आयुष्यभर बापाच्या विक्षिप्तपणाचा ठपका राहिल
घटनेनंतर नातेवाईक कमलाकर यांच्या घरी पोहचले. मिताली आणि वैष्णवी दोघाही सोबत होत्या. वैष्णवीला सगळ्यांनी जवळ घेतले. पण मिताली नातेवाईकांपासून काहीशी दूर बसली होती. आधार तर वैष्णवीचाही हरविला पण तिला नातेवाईकांची सहानुभूती लाभली. कदाचित कमलाकर यांच्या स्वभावामुळे वैष्णवीला नातेवाईकही जवळ करतील, पण मितालीचे काय? आयुष्यभर बापाच्या विक्षिप्तपणाचा ठपका तिच्या माथ्यावर राहिल.
काय आहे पार्श्वभूमी?
नागपुरात रविवारी मध्यरात्री नंदनवन भागात राहणाऱ्या कमलाकर पवनकर या भाजप कार्यकर्त्याच्या मेव्हण्याने कमलाकर, त्यांची पत्नी, आई मीराबाई, मुलगी वेदांती व आपला मुलगा कृष्णा या पाच जणांचा बत्त्याने प्रहार करून निर्घृण खून केला. या क्रौर्याने नागपूर शहारले असून आरोपी विवेकचा पोलीस कसून तपास करीत आहेत.