नागपुरात पेट्रोल @ 83
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:12 AM2018-04-26T10:12:42+5:302018-04-26T10:12:51+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २५ दिवसांत पेट्रोल प्रति लिटर तब्बल ९१ पैशांनी वधारले आहे. सरकारने पेट्रोलचे दर थेट १०० रुपयांवर न्यावेत, अशी उपरोधिक टीका ग्राहकांनी लोकमतशी बोलताना केली.
जीएसटीच्या २८ टक्के करटप्प्यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश केल्यास नागरिकांना पेट्रोल ५० रुपयांत मिळेल. पण केंद्र सरकारने वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास आणि जीएसटीमध्ये समावेश करण्यास नकार दिला आहे. पेट्रोलची मूळ किंमत ३२ रुपये असतानाही ग्राहकांना ८३ रुपयांत खरेदी करावे लागत आहे. एप्रिल महिन्यातील पेट्रोलच्या दरवाढीचा तक्ता पाहिल्यास १ एप्रिलला पेट्रोलचे दर ८२.०९ रुपये होते. त्यात तब्बल आठ दिवस दरवाढ होऊन ८ एप्रिलला ८२.४० रुपयांवर पोहोचले. त्यानंर ९ ते १३ एप्रिलदरम्यान १२ पैशांची कपात होऊन भाव ८२.२८ रुपयांवर गेले. त्यानंतर भावात निरंतर वाढ होत आहे. १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान ८१ पैशांची वाढ झाली. २० एप्रिलला पेट्रोल ८२.४५ रुपये, २१ रोजी ८२.५८ रुपये, २२ रोजी ८२.७६ रुपये, २३ रोजी ८२.८६ रुपये आणि २४ एप्रिलला पेट्रालचे दर ८२.९९ रुपयांवर पोहोचले होते. तीन वर्षांपूर्वी दुष्काळ आणि गेल्यावर्षी मद्याची दुकाने बंद झाल्यानंतर राज्य सरकारने आकारलेला अधिभार कमी केल्यास राज्यात पेट्रोलमध्ये ४ ते ५ रुपयांची कपात होईल, असे ग्राहक संघटनांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हे भाव १०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना इंधनासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे.