नागपुरात प्लास्टिकबंदीसाठी झोनस्तरावर पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:38 PM2018-04-18T23:38:33+5:302018-04-18T23:38:44+5:30
राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व कारवाईसाठी झोनस्तरावर पथक गठित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व कारवाईसाठी झोनस्तरावर पथक गठित करण्यात आले आहे. झोनस्तरावरील पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, विक्रेते व नागरिकांना प्लास्टिक वापरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे़ प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या, थर्माकोल यासह सर्व प्लास्टिकच्या वस्तू वापरावर शासनाने बंदी घातल्याची माहिती दिली जात आहे.
उद्योजक, विक्रेते व नागरिकांकडे असणाऱ्या प्लास्टिकच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना माहिती देण्यासाठी महापालिकेतर्फे नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ तसेच प्लास्टिक गोळा करण्यासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे़
उद्योजक, विक्रेत्यांकडे प्लास्टिकचा साठा असल्यास त्यांना तो राज्याबाहेर विकता येईल किंवा महापालिकेच्या केंद्रावरही प्लास्टिकच्या वस्तू जमा करता येईल़ दरम्यान, व्यापारीवर्गाचा विरोध पाहता प्लास्टिकबंदीसंदर्भातील नियमांमध्ये शासनपातळीवर काही सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे़ प्लास्टिकबंदीला मुदतवाढ मिळणार असल्याचीही चर्चा आहे़ मात्र, गेल्या महिन्यात शासनाने प्लास्टिकबंदीसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेनुसार नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे़ पहिल्या टप्प्यात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे़ याची जबाबदारी झोनस्तरावरील पथकावर सोपविण्यात आली आहे.
शासन निर्देशानुसार कार्यवाही
प्लास्टिकबंदीसंदर्भात जनजागृती केली जात आहे़ प्लास्टिक वापरू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे़ तर, जुन्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री व वापर करणाऱ्यांवर नियमित कार्यवाही केली जात आहे़ शासनाकडून पुढील दिशानिर्देश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल़
डॉ़ प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता), महापालिका