प्लास्टिकमुक्तीसाठी नागपूर प्लॉगर्सचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:35 PM2020-12-17T12:35:08+5:302020-12-17T12:35:32+5:30
Nagpur News फिटनेसकरिता धावताना वा चालताना प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करणे हा उपक्रम विविध देशांमध्ये सुरू आहे. या उपक्रमाला 'प्लॉगिंग' संबोधले जाते.
अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फिटनेसकरिता धावताना वा चालताना प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करणे हा उपक्रम विविध देशांमध्ये सुरू आहे. या उपक्रमाला 'प्लॉगिंग' संबोधले जाते. काही तरुणांनी 'नागपूर प्लॉगर्स' नावाचा समूह स्थापन करून या उपक्रमाला नागपुरात सुरुवात केली आहे.
अमल सुतोणे व कौस्तुभ फरफड हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. ते पुणे येथील प्लॉगिंग समूहाचे सदस्य आहेत. कोरोना संक्रमणामुळे नागपुरात परत आल्यानंतर त्यांना हा उपक्रम येथे सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. नागपूर प्लॉगर्स प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, ग्लास व अन्य सहज उचलता येणारा कचरा गोळा करून तो महानगरपालिकेला हस्तांतरित करतात. आठवड्यापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम लोकप्रिय झाला असून अनेकजन स्वत:हून उपक्रमात सहभागी होत आहेत. स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे हादेखील उपक्रमाचा उद्देश आहे. नरेंद्रनगर उड्डाण पूल व सोनेगाव तलाव परिसरात राबविण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेत २० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
स्वीडनमध्ये सुरुवात
एरिक अहलस्ट्रॉम यांनी २०१६ मध्ये स्वीडन येथे या उपक्रमाची सुरुवात केली. 'प्लॉगिंग'' हा 'जॉगिंग' व 'प्लॉका अप' (पिक अप) या शब्दांचा संयुक्त शब्द आहे. हा उपक्रम जगामध्ये वेगात वाढत आहे.
विवेक गौरव यांचे मार्गदर्शन
नागपूर प्लॉगर्सची स्थापना करताना पुणे प्लॉगर्सचे संस्थापक विवेक गौरव यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनी लोकमतशी बोलताना हे स्वच्छ भारत मिशनचे दुसरे रुप असल्याचे सांगितले. या उपक्रमांतर्गत स्वत:ची फिटनेस जपण्यासह परिसर स्वच्छ ठेवण्याचे कार्य केले जाते.