ओडिशात गांजा घेऊन सापडला नागपुरातील पोलीस; २१ किलो गांजा, इनोव्हा कार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:50 PM2021-09-11T23:50:06+5:302021-09-11T23:51:07+5:30
पत्नी आणि दोन साथीदारही सोबत
नागपूर : गांजाची खेप सोबत बाळगताना नागपूर शहर पोलीस दलातील एका हवालदाराला ओडिशा(पश्चिम)मधील पोलिसांनी जेरबंद केले. रोशन उगले असे त्याचे नाव असून, तो वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या कारवाईचे वृत्त शुक्रवारी रात्री शहर पोलीस दलाला कळताच एकच खळबळ उडाली आहे.
हवालदार उगले गेल्या वर्षभरापासून वाठोडा पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहे. मात्र, महिनाभरापासून तो आजारी रजेच्या नावाखाली कर्तव्यावर आलाच नाही. शुक्रवारी दुपारी ओडिशातील बरगड, सोनपूर जवळच्या बारापाली रेल्वेगेटजवळ पोलिसांनी एक इनोव्हा कार अडविली. कारची झडती घेतली असता त्यात २१ किलो गांजा आढळला. इनोव्हात हवालदार उगले अन् त्याची पत्नी, तसेच अन्य दोन साथीदार होते. पोलिसांनी त्यांची चाैकशी केली. समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे ओडिशा पोलिसांनी शहर पोलीस दलातील वरिष्ठांना ही माहिती कळविली. त्यानंतर रात्री वाठोडा पोलिसांना ते कळले. त्यामुळे पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. या संबंधाने हवालदार उगले ज्या इनोव्हात पत्नी आणि दोन साथीदारांसह आढळले, त्यात २१ किलो गांजा आढळला, अशी माहिती आम्हाला मिळाल्याचे वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यासंबंधाने तिकडे चाैकशी सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.
उगले तस्कर कसा बनला ?
आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून नागपुरात मोठ्या प्रमाणात नियमित गांजाची खेप आणली जाते. पोलिसांकडून वेळोवेळी अनेक गांजा तस्कर, तसेच गांजाची खेप आणणाऱ्यांना अटकही केली जाते. हवालदार उगले पोलीसगिरी सोडून गांजाच्या तस्करीत कसा शिरला, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.