सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 'त्या' विकृताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 11:12 AM2022-06-02T11:12:16+5:302022-06-02T11:31:35+5:30
पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणामुळे पोलीस दलदेखील हादरले होते. अखेर आरोपी मयूर मोडक (२८, रा. धरमपेठ) याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलीस त्याची आणखी विचारपूस करत आहेत.
एप्रिल ते २७ मे या कालावधीत मयूरने हा घाणेरडा प्रकार केला. अमरावती रोडवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना तो महाराजबागेजवळच्या एका पडक्या घरात आंबे, चिंच देण्याच्या बहाण्याने घेऊन जात असे. तेथे गेल्यावर त्यांना मोबाइलवर नको तसे व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. एका नऊ वर्षाच्या मुलाला २७ मे रोजी तो घेऊन गेला असता असा प्रकार केला. मुलगा वेदनांनी त्रासलेला असल्याने ही घटना समोर आली. यामुळे मुले राहत असलेल्या वस्तीत प्रचंड संतापाचे वातावरण होते व मयूर मोडकचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला होता.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो धरमपेठ भागातच फिरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने याअगोदरदेखील अशा पद्धतीने इतर मुलांवर अत्याचार केला होता का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. नीलेश पखाले, सहायक आयुक्त डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनात सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, अमोल काचोर, संतोष कदम, मगर, विनोद तिवारी, ओमप्रकाश, विशाल अक्कलवार, प्रफुल्ल मानकर, प्रीतम यादव, अमोल शिंदे, विजय दंदी यांच्या चमूने ही कारवाई केली.