लालूवर चढला प्रेमाचा 'फिवर', गर्लफ्रेंडसाठी चोरल्या १२ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 02:43 PM2022-05-20T14:43:35+5:302022-05-20T14:52:20+5:30
आयुष्यात ऐषाराम मिळावा व प्रेयसीवर खर्च करायला पैसा हवा यासाठी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला सीताबर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.
नागपूर : प्रेमात माणसं वेडी होऊन काय करतील याचा नेम नाही. नागपुरात अशाच एका प्रेमवीर चोराला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. तसा तो सराईत चोरटा असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. परंतु, या चोऱ्या आपण पोटापाण्यासाठी नव्हे तर प्रेयसीचे हट्ट पुरविण्यासाठी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
ऋषभ ऊर्फ लालू शाम असोपा (२८ रा. खांडवानी टाऊन, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. लालूला हॉटेल आणि बारमध्ये ऐषाराम करण्याचे व्यसनच आहे. त्याची एक प्रेयसीदेखील आहे. महागड्या खाण्याचा शौक आणि मैत्रिणींवर पैसे उडविण्यासाठी लालूने गुन्हा केला. तो मास्टर चावीने कुलूप उघडून गाड्या चोरतो व नंतर त्यांची विक्री करतो. ओळखीच्या लोकांकडे विक्रीसाठी नसलेल्या बाइक्स तारण ठेवतो.
लालू दीर्घकाळापासून वाहनचोरीत गुंतला असून, त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. २ मे रोजी तहसील पोलिसांनी लालूला दुचाकी चोरीच्या प्रकरणात अटक केली. त्याच्याकडून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंततर त्याने पुन्हा दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.
याबाबत सीताबर्डी पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी लालूला ताब्यात घेऊन चौकशी केली. लालूने सीताबर्डी जरीपटका, लकरगंज, नंदनवन, कोतवाली, तहसील, हुडकेश्वर आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या परिसरांतून १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी लालूला अटक करून दुचाकी जप्त केल्या.
उपायुक्त डॉ. संदीप पखाले व सहायक आयुक्त डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, एपीआय संतोष कदम, पीएसआय कैलास मगर, जयपाल राठोड, चंदू गौतम, रामेश्वर गित्ते, प्रवीण वाकोडे, संदीप भोकरे, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, रमण खैरे, प्रज्ञा चांदपूरकर यांनी ही कारवाई केली.