चोरीच्या पैशातून कार विकत घेतली, त्यातूनच मालाची हेराफेरी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:19 PM2022-01-12T16:19:07+5:302022-01-12T16:35:06+5:30
चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले.
नागपूर : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अत्याचार करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेला कुख्यात गुन्हेगार घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंकज कन्हैयालाल उरकुडे (वय २०, रा. बेलतरोडी) नामक या गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचा साथीदार प्रणव ठाकरे (रा. खामला) मात्र फरार आहे.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी नीलेश शर्मा हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. त्यांच्या घरातील १ लाख १८ हजारांची रोकड तसेच लॅपटॉप मोबाइलसह १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सोनेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चाैकशी केली असता, आरोपी पंकज उरकुडे आणि प्रणव ठाकरे यात सहभागी असल्याचे कळाले. त्यावरून पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत जाऊन आरोपी पंकजच्या मुसक्या बांधल्या.
त्याच्याकडून एका कारसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, आरोपी पंकजने एका अल्पवयीन मुलालाही पळवून नेल्याचे यावेळी उघड झाले. त्याने गुन्ह्यांची कबुली देतानाच सोनेगाव तसेच बजाजनगरातील घरफोडीचे गुन्हे कुख्यात चोरटा प्रणव ठाकरेच्या मदतीने केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, चोऱ्या, घरफोडी करून अय्याशी करण्याच्या वृत्तीचे हे दोन्ही गुन्हेगार आहेत. पंकजकडून पोलिसांनी एक कारही जप्त केली. चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून १ लाख ७४ हजार ७०० रुपये किमतीची ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले आहे.
इकडे चोरी तिकडे ऐशआराम
आरोपी पंकज आणि प्रणव ठाकरे हे नागपुरात चोऱ्या करून मोर्शीत ऐशआरामाचे जीवन जगत होते. त्यांनी तेथे एक घर भाड्याने घेतल्याचेही प्राथमिक चाैकशीतून उघड झाले आहे. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.