नागपूर पोलीस आयुक्त पोहोचले मजुरांच्या कॅम्पमध्ये : व्यवस्थेचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:10 PM2020-05-11T19:10:23+5:302020-05-11T19:14:00+5:30
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली. येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील मजुरांशी संवाद साधला आणि त्यांची व्यथाही समजून घेतली.
नागपुरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सेवाभावी संस्था, संघटना आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शहराला जोडणाऱ्या वेगवेगळ्या सात ठिकाणी व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था कशी आहे, मजुरांना बाहेरगावी पाठविताना त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज दुपारी १२ च्या सुमारास पांजरी टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये पोहोचले. येथे त्यांनी कोणत्या वाहनातून, कोणत्या गावाला पाठविण्यात येत आहे, त्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मजुरांशी संवाद साधला. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत मिळाल्या की नाही, त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे त्यांना धीर देऊन सुखरूप परत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मध्ये काही अडचणी आल्यास नागपूरपोलिसांशी संपर्क करण्याचीही सूचना केली. मजुरांनी डॉ. उपाध्याय यांना धन्यवाद दिले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकून पडलेल्या हजारो परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची व्यवस्था २६ शेल्टर होममध्ये करण्यात आली होती. तेथे त्यांना जेवण तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविल्या जात होत्या. शिवाय त्यांच्या मनोरंजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात होते. सरकारकडून त्यांना त्यांच्या गावात पाठविण्याची सूचना मिळताच पोलिसांनी या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सुमारे ५० बसेसची व्यवस्था विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून केली आहे. आजपावेतो ९ ते १० हजार मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचविण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे, हे कार्य नियमित सुरू आहे.
अजूनही अनेक ठिकाणचे मजूर
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मजुरांसह, यूपी, एमपी, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारसह अनेक राज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. मात्र, अजूनही असे शेकडो मजूर नागपुरात आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी एकूण सात ठिकाणी त्यासाठी तात्पुरते कॅम्प उभारले आहेत. याच ठिकाणी मजुरांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येत आहे.