‘प्रोफेसर गँग’ला नागपूर पोलिसांचा झटका, चौघांना अटक; गुंतवणूकदारांची रक्कम मिळाली परत
By योगेश पांडे | Published: July 10, 2024 11:41 PM2024-07-10T23:41:28+5:302024-07-10T23:41:52+5:30
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींनी तब्बल १.१५ कोटी केले होते लंपास
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली विविध नावांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून सायबर ठगांच्या ‘प्रोफेसर गॅंग’ला नागपूर पोलिसांनी चांगलाच झटका दिला आहे. दोन प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक करत गुंतवणूकदारांना १.१५ कोटींची रक्कम परत मिळवून दिली. ‘मनी ट्रेल’च्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून पैसे मिळवू शकल्या जातात यावर ‘लोकमत’ने ‘ट्रेडिंगचा भुलभुलय्या’ या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता व या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मोती किशनचंद दुलारामानी (७८, कॅनल रोड, रामदासपेठ) यांची सायबर ठगांनी २.४८ कोटींनी फसवणूक केली होती. त्यांना आरोपींनी ‘झार स्टॉक फ्रंटलाईन ६८’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर जास्त नफ्याचे आमिष दाखवत त्यांना ‘सीएचसी-एचईएस’ या ॲपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करायला लावली. यात दुलारामानी यांनी २.४८ कोटी रुपये गमावले. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता व तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत मनी ट्रेलच्या माध्यमातून आरोपींच्या खात्यातून रक्कम कुठे कुठे गेली याची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित बॅंकांना पत्रव्यवहार करून बॅंक खाते गोठविण्यात आले.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दुलारामानी यांना १.०७ कोटी रुपये परत मिळवून देण्यात यश आले. उर्वरित रक्कमदेखील लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तपासादरम्यान पोलीस मनोज प्रतापचंद बंसल (५०, आग्रा, उत्तरप्रदेश), राजेशकुमार सियाराम गोयल (५७, गाजीयाबाद, उत्तरप्रदेश), तुषार संजयकुमार गर्ग (३०, नवी दिल्ली), विकास किसनकुमार बंसल (५२, नवी दिल्ली) यांच्यापर्यंत पोहोचले व त्यांना अटक केली. या आरोपींविरोधात नवी दिल्लीतदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात ते अगोदरच अटकेत आहेत. त्यांचा ताबा लवकरच घेण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक अमित डोळस, संदीप बागुल, दत्तात्रय निनावे, गजानन मोरे, अजर पवार, योगेश काकड, रोहीत मटाले, सुशील चनगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
८.३८ लाख देखील मिळाले परत
दुसऱ्या एका प्रकरणात आरोपींनी महेश राजेश्वर मानकर यांना ८.३८ लाखांनी गंडा घातला होता. आरोपींनी त्यांना डोलो हे ॲप डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांना सुरुवातीला नफा मिळाला. मात्र पैसे निघतच नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपींच्या बॅंक खात्यांना गोठविले व त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना पूर्ण रक्कम परत मिळवून दिली.