नागपूर पोलिस ‘दक्ष’; अधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 09:55 PM2023-05-15T21:55:56+5:302023-05-15T21:56:22+5:30
Nagpur News अकोला व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तणावाची स्थिती असल्याने नागपूर पोलिसांनीदेखील ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात रहावी यासाठी पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर : अकोला व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तणावाची स्थिती असल्याने नागपूर पोलिसांनीदेखील ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात रहावी यासाठी पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, सर्व पोलिस निरीक्षकांना गस्त घालण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहरातील स्थितीचा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. प्रत्येक लहानसहान तक्रारी व खबऱ्यांच्या माहितीला गांभीर्याने घ्याव्या तसेच नागरिकांशी जास्तीत जास्त प्रमाणात संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आजच्या स्थितीत अतिजलद प्रतिसाद पथक, विशेष पथकासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनासुद्धा सतर्क ठेवण्यात आले आहे. नागपूर व आजूबाजूच्या भागात समाजकंटक तणाव पसरविण्याचा प्रयत्न करू शकतात. या पार्श्वभूमीवर ‘सोशल मीडिया’वरदेखील ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनाही आयुक्तांनी ‘अलर्ट मोड’वर ठेवले आहे. संवेदनशील भागात बंदोबस्तावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच समाजकंटकांच्या हालचालींवरदेखील लक्ष ठेवण्यात येत असून, २४ तास सर्व पोलिस ठाण्यांनी सतर्क राहण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.