नागपूर पोलिसांनी गायब केले सव्वादोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:44 AM2018-04-19T00:44:42+5:302018-04-19T00:44:54+5:30
‘रमी क्लब’वर टाकलेल्या धाडीदरम्यान गणेशपेठ पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडेच ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह याची तक्रार केली आहे; सोबतच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युथ काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘रमी क्लब’वर टाकलेल्या धाडीदरम्यान गणेशपेठ पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडेच ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह याची तक्रार केली आहे; सोबतच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युथ काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
वाडी येथील रहिवासी शब्बीर शेख यांचा गंजीपेठ येथे विश्वनाथ बहुउद्देशीय क्रीडा मंडळ या नावाने ‘रमीचा क्लब’ आहे. क्लब चालविण्यासाठी २५ एप्रिल रोजी आनंद वानखेडे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची मागणी केली. वानखेडेने ठाणेदार गांगुर्डे यांच्या नावाने आणखी ५० हजार व इतरांसाठी २० हजार प्रति महिना देण्याचेदेखील शेख यांना सांगितले. शेख यांनी याला नकार दिला व त्यानंतर २८ मार्च रोजी ‘क्लब’वर छापा मारण्यात आला. तेथे पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. त्यावेळी शब्बीर यांची दुचाकी ‘क्लब’च्या बाहेर उभी होती. त्यात २ लाख २० हजार रुपये होते. वानखेडेने ही रक्कम स्वत:जवळ ठेवून घेतली. ‘क्लब’मध्ये बसलेल्या इतर व्यक्तींच्या वाहनांमधूनदेखील पैसे काढण्यात आले. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाºयांनी दुचाकी वाहनांच्या डिक्कीमधून मिळालेल्या रकमेबाबत कारवाईत काहीही उल्लेख केला नाही, अशी तक्रार शब्बीर शेख यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे दाद मागितली. त्यांनी कुठलेही पाऊल न उचलल्याने मंगळवारी युवक काँग्रेसचे सचिव अजित सिंह यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे तक्रार केली. बोडखे यांनी प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गणेशपेठमध्ये गैरप्रकार वाढले
गणेशपेठ पोलीस ठाण्यातून वसुलीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या परिसरात अवैध धंदे व गैरप्रकारांना अभय मिळाले आहे. हॉटेल चालक तसेच ट्रॅव्हल्सच्या चालकांकडूनदेखील वसुली करण्यात येते, असा आरोप अजित सिंह यांनी केला व शिवाजी बोडखे यांनादेखील याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे आणि आनंद वानखेडे यांना निलंबित करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.