गुन्हेगाराकडे आढळले ६ जिवंत काडतूस; रॅकेट समोर आल्यानंतर पोलिसांना जाग
By योगेश पांडे | Published: November 7, 2023 04:38 PM2023-11-07T16:38:54+5:302023-11-07T16:39:47+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई
नागपूर : मोमीनपुरा येथे पिस्तुल-काडतुसांच्या विक्रीचे रॅकेट समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांनी एका गुन्हेगाराच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे सहा जिवंत काडतूसे आढळून आली. गुन्हेगार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख अफसर उर्फ अंडा शेख युसूफ (५०, राजीव गांधीनगर, आयबीएम रोड) याच्याकडे पिस्तुल व इतर घातक शस्त्र असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्याच्या घरी धाड टाकून शोधाशोध केली असता घरातून ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्या पत्नीला विचारणा केली असता शेखने ती आणून ठेवल्याचे तिने सांगितले.
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. नागपुरात अशा पद्धतीने अनेक गुन्हेगारांकडे देशी पिस्तुले व काडतुसे असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्यांची खरेदीविक्री सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे