गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:53 AM2017-07-18T01:53:10+5:302017-07-18T01:53:10+5:30
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांसमवेत पूर्वतयारी सभेचे आयोजन केले होते.
‘नीरी’त पूर्वतयारी सभा : वैज्ञानिकांकडून पर्यावरणावरील परिणामांची जाणून घेतली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांसमवेत पूर्वतयारी सभेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवादरम्यान विविध प्रकारच्या प्रदूषणांमध्ये वाढ होते. नागरिकांच्या पुढाकारातून यात घट होऊ शकते. याबाबत संयुक्त विद्यमाने जागृतीदेखील करण्यात आली. तसेच वैज्ञानिकांकडूनदेखील याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यात आले.
‘नीरी’च्या सभागृहात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम् प्रामुख्याने उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण यांच्यात वाढ होते. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्यादेखील समोर येते याकडे त्यांनी लक्ष वेधले. सोबतच गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणाला बसणारा फटका यावरदेखील त्यांनी भाष्य केले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी यावेळी गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस कशा पद्धतीने तयार आहे, याबाबत सादरीकरण केले. यावेळी ‘नीरी’चे मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे हेदेखील उपस्थित होते. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.कृष्णा खैरनार हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट
दरम्यान, जी.एच.रायसोनी लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘नीरी’ला भेट दिली. ‘नीरी’ची नेमकी कार्यप्रणाली कशी आहे तसेच येथे कुठल्या प्रकारचे संशोधन होते, हे त्यांनी जाणून घेतले. यावेळी विविध प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. ‘नीरी’चे प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण विज्ञान व पर्यावरणासंबंधीच्या विविध धोरणांची माहिती दिली. डॉ.सोना कुमार या समन्वयक होत्या.