राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 10:53 PM2022-04-08T22:53:54+5:302022-04-08T22:54:20+5:30

Nagpur News गुन्हे नियंत्रणासह विविध पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून नागपूर पोलिसांनी राज्यात सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान मिळवला.

Nagpur police honored for best policing in the state | राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान

राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान

Next
ठळक मुद्देगृहमंत्र्यांनी दिले प्रशस्तीपत्र

नागपूर - गुन्हे नियंत्रणासह विविध पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून नागपूर पोलिसांनी राज्यात सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान मिळवला. मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या अर्धवार्षिक गुन्हे परिषदेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तशी घोषणा करून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा सत्कार केला.

कोरोनाने गेल्या दोन वर्षांत नागपूरसह सर्वत्र हाहाकार मचवला असताना राज्यात गुन्हेगारीही वाढली होती. या पार्श्वभूमीवर, सन २०२० मध्ये पोलिसांनी एकीकडे क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावला, अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांना कारागृहात डांबले, गुन्हेगारी नियंत्रीत करण्यासोबतच आरोपींना शिक्षा होण्याचे (दोष सिद्धता) प्रमाण वाढवले. प्रशासन गतीमान करून कोरोनात कर्तव्य बजावताना मृत झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी मदत केली. याचसोबत जनतेशी सुसंवाद वाढवण्यावरही भर दिला.

राज्यातील सर्वच मुख्यालयातून या सर्व बाबींचे मुल्यांकन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, ‘ब’ गटात नागपूर शहर पोलीस राज्यात अव्वलस्थानी आले. तशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. शुक्रवारी राज्याची अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषद पार पडली. यात गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासह पोलीस महासंचालक रजनिश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव या परिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर पोलिसांच्या कामगिरीचे काैतुक करण्यात आले. गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा गाैरव केला.

पोलीस आणि जनतेला श्रेय - अमितेशकुमार

या गाैरवाचे श्रेय शहर पोलीस दलात सेवारत सर्व सहकारी आणि नागपूरकर नागरिकांना आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला दिली. गुन्हेमुक्त शहर करण्याचा आपला संकल्प असून, त्यासाठी आमचे पोलीस आणि नागरिक भरिव सहकार्य करतात. त्याचमुळे नागपूर पोलिसांना हा मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

-----

Web Title: Nagpur police honored for best policing in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस