'नो पार्किंग'च्या कारवाईत नागपूर पोलिस आघाडीवर, वाहतूक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष
By योगेश पांडे | Published: November 29, 2023 05:36 PM2023-11-29T17:36:54+5:302023-11-29T17:38:17+5:30
अस्ताव्यस्त पार्किंगसाठी पाच कोटींहून अधिकचा दंड : १० महिन्यांत १.१५ लाख ‘फोरव्हिलर्स’कडून नियमांचा बट्ट्याबोळ
नागपूर : मागील काही काळापासून उपराजधानीत वाहतूक कोंडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी तर शहरातील अनेक चौक अक्षरश: ब्लॉक असतात. मात्र या ठिकाणी वाहतूकीचे नियोजन करण्याऐवजी पोलिसांचे लक्ष ‘नो पार्किंग’वरील कारवाईत जास्त दिसून येते. नागपुरातील वाहनचालक बेशिस्त आहेतच, मात्र वाहतूक पोलिसदेखीलवाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी दंड वसूल करण्यातच जास्त धन्यता मानत असल्याचे वास्तव आहे. १० महिन्यांत पोलिसांनी ‘नो पार्किंग’वरील कारवाईतून पाच कोटींहून अधिकचा दंड वसूल केला, मात्र तरीदेखील वाहतूक कोंडी जैसे थे असल्याचेच चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत वाहतूक पोलिसांकडे नागपुरातील एकूण नियमभंगाच्या कारवाया व वसूल झालेला दंड याची माहिती विचारली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ‘नो पार्किंग’च्या ८८ हजार १८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यात २६,१२३ कार, २ हजार ३८२ बसेस, १३ हजार ९९ ट्रक व ४६ हजार ५७८ लहान वाहनांचा समावेश होता. त्यांच्याकडून एकूण ५ कोटी २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण नियमभंगातून वाहतूक पोलिसांना ५५ कोटी २८ लाखांचा महसूल प्राप्त झाला. या वर्षभरात ही रक्कम मागील वर्षीहून खूप जास्त असेल अशीच चिन्हे आहेत. मात्र दंड वसूल झाल्यावरदेखील त्या तुलनेत वाहतूकीला शिस्त येत नसल्याचे दिसून येत आहे.
- कारचालकांकडून सर्वाधिक नियमभंग
१० महिन्यांच्या कालावधीत नागपुरात चारचाकी गटात कारचालकांकडून सर्वाधिक वाहतूकीचे नियम मोडण्यात आले. ६९ हजार ९०८ कारचालकांनी नियमांचा भंग केला. त्यापाठोपाठ ४१ हजार ९६७ ट्रक व ४ हजार ७९ लहान वाहनांचा समावेश होता. या कालावधीत शहरातील किती बसेसने नियम तोडले याची माहिती वाहतूक विभागाकडेदेखील नाही.-
- २६ हजार मुजोर ऑटोचालकांवर कारवाई
शहरातील अनेक चौकांमध्ये मुजोर ऑटोचालक व त्यांच्यामुळे होणार वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई तर होते, मात्र दुसऱ्या दिवशी परत तीच समस्या कायम असते. १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी २६ हजार २४८ ऑटोचालकांवर कारवाई केली व त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाखांचा दंड वसूल केला.