नागपूर पोलिसांचा आता कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 08:50 PM2020-08-25T20:50:21+5:302020-08-25T20:52:05+5:30
नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे पोलिसांना आता गुन्हेगारांसोबतच कोरोनाशीही लढा द्यावा लागत आहे.
कोरोनाने नागपुरात शिरकाव केल्यापासून संपूर्ण पोलिस यंत्रणा नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावली. उन्हातान्हात पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पोलिसांवरच आक्रमण केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात आतापर्यंत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. भरणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख, संतोष खांडेकर यांच्यासह एकूण ४१७ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष तपासणी पथक तसेच त्यांच्या घरोघरी जाऊन औषध पुरविणारे पथक निर्माण केले आहेत. पोलीस इस्पितळाचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथक बाधित पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेत आहेत. त्यांना आवश्यक त्या सूचना आणि निर्देश दिले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या तसेच सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
लागण झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कुटुंबीय : ४१७
रुग्णालयात भरती असलेले : १९
होम आयसोलेटेड : ३२३
कोविड सेंटर : १२
होम क्वारंटाईन : ६०
आतापर्यंत बरे झालेले : ६९
मृत : ३
कर्तव्यावर हजर झालेले : ९
कोरोनासोबत पोलिसांचा लढा सुरू आहे. स्वत:सोबतच नागरिकांचेही कोरोनापासून रक्षण करण्यात आम्ही यश मिळवू, हा विश्वास आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर.