डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘खाकी’चे अनोखे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 10:41 PM2022-04-15T22:41:23+5:302022-04-15T22:44:09+5:30

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीदिनी नागपूर पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त राखला. त्याकरिता त्यांनी सलग ३६ तास अविश्रांत कर्तव्य पार पाडून अनोखी आदरांजली बाबासाहेबांना अर्पण केली.

Nagpur police pay unique greetings to Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘खाकी’चे अनोखे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘खाकी’चे अनोखे अभिवादन

Next
ठळक मुद्देसलग ३६ तासांचा बंदोबस्तरखरखत्या उन्हात अनेकांची मदत

नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. समाजातील विविध घटकांनी, सानथोरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहून त्यांचे स्मरण केले. पोलिसांनीही सलग ३६ तासांचा अविश्रांत बंदोबस्त करून रखरखत्या उन्हात अनेकांना मदत केली अन् बाबासाहेबांना आपल्या कर्तव्यातून अभिवादन केले.

दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे सण-उत्सव, जयंतीसह जेथे गर्दी होईल, अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झाल्याने नियम शिथिल झाले. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. परिणामी, यंदा बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम जोरदार होईल, असे संकेत होते, तसेच झाले. उपराजधानीतील प्रत्येक मोहल्ल्यात १३ एप्रिलच्या सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी जयंतीच्या तयारीची लगबग सुरू केली होती. मंडप, स्वागतकमानी, तोरणं-पताका, स्टेजची तयारी करतानाच ठिकठिकाणचे बुद्धविहारही सुशोभित करणे सुरू झाले होते. त्यांचीही तयारी असताना पोलिसांनीही बंदोबस्ताच्या रूपाने शहरभर कर्तव्याची तयारी चालवली होती. कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी १३ एप्रिलच्या सकाळपासून पोलीस दिसत होते. मध्यरात्री मोहल्ल्या-मोहल्ल्यांत ‘बर्थ डे केक’ कापले जात असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येत पोलिसांचा ताफा तैनात होता.

रात्रंदिवसाची गस्तही दिसून येत होती. खासकरून दीक्षाभूमी, संविधान चाैकात रात्रभर पोलीस डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावत होते. त्यानंतर पुन्हा त्यांची सकाळपासून सेवा सुरू झाली. १४ एप्रिलला सकाळपासून रात्रीपर्यंत बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शहरातील कानाकोपऱ्यांतून रॅली आल्या. अनुयायांची दिवसभर संविधान चाैकात वर्दळ होती. त्यात तरुणाईसोबत वृद्धांचीही संख्या मोठी होती. अनेकजण काठी टेकत आले. रखरखत्या उन्हात त्यांना पोलीस मदत करताना दिसत होते. कुणाला पाणी तर कुणाला नाश्ताही त्यांनी आणून दिला. १४ एप्रिलची मध्यरात्र झाली तरी पोलिसांची कर्तव्यसेवा सुरूच होती.

‘कर्तव्याचा सत्कार’

पाचपावलीतील एका सेलिब्रेशन हॉलमध्ये जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर शहर पोलीस दलात वर्षभर उल्लेखनीय कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

----

Web Title: Nagpur police pay unique greetings to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस