नागपुरातील एस.के. बीअरबारमध्ये पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:13 PM2020-04-18T23:13:15+5:302020-04-18T23:15:10+5:30

हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

Nagpur Police raid on SK Beer bar | नागपुरातील एस.के. बीअरबारमध्ये पोलिसांचा छापा

नागपुरातील एस.के. बीअरबारमध्ये पोलिसांचा छापा

googlenewsNext
ठळक मुद्देबंदी असतानाही मद्याची विक्री : हुडकेश्वर पोलिसांनी केला दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. तुषार दिलीप वानखेडे (रा. अलंकारनगर), मिलिंद देवीदास खाडे आणि जावेद ऊर्फ गुड्डू कयूम शेख (रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) अशी या तिघांची नावे आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर बार आणि मद्याची सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे नागपुरातील सर्व बीअरबार आणि मद्याची दुकाने बंद करून त्यावर सरकारी सील लावण्यात आले. परंतु अनेक बारमालक आपल्या सील केलेल्या बारमधून बेमालूमपणे दारू बाहेर काढतात आणि ती दामदुप्पट किमतीने छुप्या मार्गाने विकतात. नागपूर शहरात हा प्रकार सर्रास सुरू आहे. तशा प्रकारचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान, मानेवाडा चौका जवळच्या एस. के. बीअरबारमध्ये असलेला मद्यसाठा छुप्या मार्गाने आरोपी तुषार वानखेडे, मिलिंद खाडे आणि जावेद शेख ग्राहकांना विकत असल्याची माहिती या भागात होती. त्यामुळे बीअरबार जेथे आहे, त्या शारदा अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावर मद्यशौकिनांची मोठी गर्दी होत होती. ही माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी रात्री तेथे बनावट ग्राहक पाठवून कोणती कोणती दारू मिळते त्याची शहानिशा करून घेतली. त्यानंतर छापा घातला. पोलिसांना या छाप्यात रॉयल स्टॅग, क्रिसेंट, मॅजिक मोमेंट अशा वेगवेगळ्या महागड्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्याची विक्री करणाºया उपरोक्त आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला. प्राथमिक चौकशीत उपरोक्त आरोपींनी एस. के. बारमधून ही दारू काढली आणि ते ती बंदी असतानादेखील विकत होते हे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, हवालदार प्रवीण गाणार, मनोज नेवारे, शिपाई विलास चिंचोळकर, चंद्रशेखर कौरती आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी ही कामगिरी बजावली.

अनेक ठिकाणी हाच प्रकार!
विशेष म्हणजे, एस. के. बारसारखाच प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. बारमालक छुप्या पद्धतीने बारमधून दारूसाठा काढून तो ग्राहकांना अवैधपणे दामदुप्पट रक्कम घेऊन विकत आहेत. दोसर भवन चौकातील मदिरा बीअरबारचा मालक नीरज गुप्ता याने संगनमत करून त्याच्या बारमधील बीअरचा साठा नातेवाईकांच्या मेडिकल स्टोअर्समध्ये ठेवला आणि तेथून या बीअरची विक्री होत होती. गणेशपेठ पोलिसांनी तेथे छापा घालून कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदिरा बीअरबारचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. या कारवाईचा शुक्रवारी बोभाटा झाला असतानादेखील मानेवाडा चौकाजवळच्याच एका बीअरबारमधून बारमालक आणि त्याचे साथीदार मागच्या बाजूने दारूच्या पेट्या काढून त्या कारमध्ये ठेवत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र २४ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही संबंधित बारमालकावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही.

Web Title: Nagpur Police raid on SK Beer bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.