देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी, फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:11 PM2023-03-28T12:11:49+5:302023-03-28T12:44:01+5:30
फेक कॉल असल्याचं तपासात उघड
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरस्थित घरापुढे बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन पोलिसांना आला. मध्यरात्री आलेल्या या कॉलने पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ फडणवीस यांच्या घराच्या आसपासच्या परिसराची कसून पाहणी केली असता असे काही आढळून आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री २च्या सुमारास एक कॉल आला व त्यात एका व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या घरापुढे बॉम्ब ठेवल्याचे सांगत धमकी दिली. त्यानंतर हा फोन कट झाला. यानंतर फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी फडणवीस यांच्या घराजवळील परिसराची पूर्णपणे तपासणी केली. यावेळी संशयास्पद अशी कुठलीही वस्तू आढळून आली नाही.
दरम्यान, पोलिसांनी ज्या परिसरातून हा फोन आला त्याची चौकशी केली. सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन त्याने केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.