किन्नरांच्या संघर्षात नागपूर पोलिसांनी केली दिलजमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:43 AM2018-02-07T10:43:48+5:302018-02-07T10:45:55+5:30
मध्य भारतातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नागपुरातील तृतीयपंथीयांचा वाद सोडविण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजाच्या तिरस्काराचे ओझे घेऊन जगणारे किन्नर (तृतीयपंथी) शहराच्या हिस्सेवाटणीसाठी ‘त्यांच्याच पंथा’तील मंडळीचे शत्रू बनले. वाद वाढतच गेला अन् रोजच टिंगल टवाळीला सामोरे जाऊन जगण्यामरण्याचा संघर्ष करणारी ही मंडळी स्वपंथीयांच्या जीवावर उठली. कुणी चाकू तर कुणी ब्लेड जवळ ठेवून स्वकीयांमधील प्रतिस्पर्ध्याला धडा शिकविण्याच्या तयारीने बाहेर निघू लागली. त्यांच्यातील संघर्ष एवढा टोकाला पोहचला की एका गटप्रमुखाने चक्क पिस्तूलच जवळ बाळगले. नुसते बाळगले नाही तर फायरही केला. त्यांच्यातील स्फोटक वाद पोलिसांसाठीही डोकेदुखीचा विषय होता. तो कसा सोडवावा, हेच कळत नव्हते. मात्र, अखेर पोलिसांनी त्यावर उतारा काढला. दोन-तीनही गट समोरासमोर बसविले. त्यांचे समुपदेशन केले. संघर्षाच्या परिणामाची कल्पना दिली अन् अखेर ते एक झाले. होय, मध्य भारतातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नागपुरातील तृतीयपंथीयांचा वाद सोडविण्यात पोलिसांनी अखेर यश मिळवले.
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात समुद्र सोडून सगळेच आहे, असे म्हटले जाते. येथील विविध वैशिष्ट्यांचा पदर धरून वेगवेगळ्या जात-धर्म-पंथांची मंडळी येथे गोडीगुलाबीने राहतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. नागपुरातील तृतीयपंथीय मात्र त्याला अपवाद होते. ते एकमेकांच्या जीवावरच उठले होते. उपराजधानीत अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचे वास्तव्य आहे. येथे राहत असलेल्या तृतीयपंथीयात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, हैदराबाद, रायपूर, भोपाळ आणि दिल्लीसह अन्य प्रदेशातील किन्नरांचा समावेश आहे. ते वेगवेगळ्या गटात राहतात. उपराजधानीतील कोणत्या भागात कुणी फेरी मागायची (रक्कम गोळा करायची), कोणत्या शुभकार्यात कोण बधाई (शुभेच्छा) देणार आणि कोण रक्कम घेणार, दसरा-दिवाळीसह अन्य सणोत्सवात कोण आणि कुणी बोजारा घ्यायला जाणार, या मुद्यावरून त्यांच्यात चार वर्षांपूर्वी कुरबूर सुरू झाली. ती वाढतच गेली. ती एवढी वाढली की त्यांच्यात हाणामाऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे एका गटाच्या प्रमुखाने आपला गाशा गुंडाळत नागपूर सोडले. त्यानंतर उत्तम सपन सेनापती, चमचम, मोहिनी नायक आणि मीना नायक या चार गटांचे नेतृत्व करू लागले (लागल्या!) त्यांच्यातील वाद अधिकच टोकदार झाला. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी भांडताना ते चाकू, सुरा, ब्लेड, दगड, काठ्या घेऊन एकमेकांना रक्तबंबाळ करू लागले. पोलिसांत तक्रारी होऊ लागल्या. गुन्हेही दाखल झाले. प्रत्येक गुन्ह्यानंतर गटागटातील वैमनस्य तीव्र झाले.
गेल्या आठवड्यात त्यांनी भरदुपारी वर्धमाननगरसारख्या अत्यंत वर्दळीच्या भागात एकमेकांवर जोरदार हल्ला चढवून जबर जखमी केले. यापूर्वीही नंदनवन, तहसील, पाचपावली, जरीपटका आणि लकडगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले. दोन्ही गट एकमेकांवर बोगस (बनावट तृतीयपंथी) असल्याचा आरोप करीत होते. कारण त्यांना शहरातील सर्वाधिक व्यापारी प्रतिष्ठाने असलेला परिसर फेरीसाठी (रक्कम मिळवण्यासाठी) हवा होता. त्यांचा वाद केवळ नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील तृतीयपंथीयांसाठीही चर्चा आणि चिंतेचा विषय ठरला होता. तो लक्षात घेत पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी हा वाद निकाली काढण्याचा संकल्प केला. त्यानुसार, आधी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर दोन्ही गटाचे अनुक्रमे उत्तम सेनापती आणि चमचम तसेच मोहिनी आणि मीना यांना त्यांच्या समर्थकांसह वेगवेगळे बोलवले. त्यांना या वादाच्या दुष्परिणामाची कल्पना दिली. त्यांचे समुपदेशन केले. दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखविले. त्यानंतर त्यांची शुक्रवारी २ जानेवारीला एकत्र बैठक घेतली अन् त्यांच्यात समेट घडवून आणला.
छोडो भी गुस्सा...
काही वेळेपूर्वी एकमेकांकडे द्वेषपूर्ण भावनेने बघून शिव्या हासडणारे दोन्ही गट प्रमुख ‘छोडो भी गुस्सा...’ म्हणत एकमेकांच्या गळ्यात पडले. तत्पूर्वी एका स्टॅम्प पेपरवर त्यांनी आपसी समेटपत्र पोलिसांना लिहून दिले. आपण आता गुण्यागोविंदाने राहू, असा संकल्प दोन्ही गटप्रमुख तसेच त्यांच्या समुदायातील शेकडो समर्थकांनी केला. पोलिसांच्या सामाजिक भूमिकेमुळे हे शक्य झाले.
नंदनवनमधील विवस्त्र गोंधळ
हिंसक संघर्षानंतर पोलीस कारवाईमुळे तृतीयपंथीयांच्या चार गटाचे दोन गट झाले. उत्तम सेनापती आणि चमचमचा एक तर मोहिनी आणि मीनाचा दुसरा गट पाचपावली तसेच हंसापुरीके नायक नावाने ओळखला जाऊ लागला. गट दोन झाले त्यामुळे वादही तीव्र झाला. गेल्या वर्षी अशाच प्रकारे त्यांच्यात वाद झाल्यानंतर उत्तम सेनापती चक्क पिस्तूल घेऊनच निघाले. दुसऱ्या गटाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावरचे कपडे फेकून विवस्त्र गोंधळ घातला. त्यावेळी ते एवढे आक्रमक झाले होते की ठाण्यातून पोलिसांना चक्क पळ काढावा लागला होता.