‘मीम्स’च्या माध्यमातून नागपूर पोलिसांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:20 AM2018-09-28T11:20:36+5:302018-09-28T11:21:04+5:30
ट्विटर या माध्यमावर नागपूर पोलिसांनी कायद्याच्या जनजागृतीसाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर प्रसारित केलेले ‘मीम्स’ सर्वत्र गाजत आहेत.
अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्विटर या माध्यमावर नागपूर पोलिसांनी कायद्याच्या जनजागृतीसाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर प्रसारित केलेले ‘मीम्स’ सर्वत्र गाजत आहेत. ज्यांना टिष्ट्वटरबाबत अधिक माहिती नाही त्यांच्यासाठी पोलिसांनी ‘शोले’ चित्रपटाची पार्श्वभूमी ठेवून चौकाचौकात पोस्टर्स लावले आहेत. ड्रंकन ड्राईव्ह, हेल्मेट वापरण्याचे फायदे व इतर कायदेविषयक गोष्टींवर जनजागृती करणारे हे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. जनजागृतीचा उद्देश साधतानाच पोलिसांची लोकप्रियता वाढविण्यात या मीम्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांच्या या कलात्मक जनजागृतीमागे मेंदू आहे तो तहा उद्दीन या १९ वर्षीय तरुणाचा.
तहा उद्दीन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी. डोळ्याने खाणाखुणा करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश हिचा व्हिडीओ ट्रेन्डमध्ये असताना तहाने सहजच शहर पोलिसांसाठी तिच्यावर मीम्स तयार करून टिष्ट्वटरवर शेअर केला. अनेकांना तो आवडलाही. त्यात नागपूर पोलिसांचाही समावेश होता. पोलिसांनी तहाला मुलाखतीसाठी बोलाविले. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेतली. त्यांनाही या नव्या ट्रेंड्सची कल्पना पटली. असे विनोदी मीम्स तयार करून शहर पोलिसांच्या आॅफिशियल अकाऊंटवर प्रसारित करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मकतेमुळे उत्साह वाढल्याचे त्याने सांगितले. तहा स्वत: मीम्सची निवड करतो, त्याचे कन्टेंट लिहितो व पोलिसांच्या संबंधित विभागाकडे अंतिम निर्णयासाठी सादर करतो. विविध कसोट्यांवर तपासणी करून होकार आला की तो प्रसारित करतो.
तहाने तयार केलेले अभिनेत्री राधिक आपटे हिचे नेटवरील अपिरन्स, कौबक आणि अजय देवगणवर तयार केलेले ‘नाहीतर आता आमची सटकेल’ हे मीम्स बरेच गाजले. शहरातील ११ चौकात लागलेले ‘शो-लॉ’चे पोस्टर्स सध्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. विनोदी गोष्टींकडे लोकांचे लक्ष लवकर वेधले जाते. त्यामुळे अशा विनोदी मीम्समधून लोकांना नियम पाळण्यासाठी जागृत करीत असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे तो म्हणाला. आई मल्लिका कलीम या प्राध्यापक व वडील एम. कलिम हे वकील आहेत. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
वयात बरेच अंतर असले तरी आमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे. तहाचे कन्टेंट हे लोकाभिमुख असून लक्ष वेधणारे आहेत. त्याने काम सुरू केल्यापासून पोलिसांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील लाईक्स आणि रिटिष्ट्वट करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांना काय आवडेल, याची त्याला कल्पना आहे व चांगले काहीतरी देण्याचा तो प्रयत्न करतो.
- विशाल माने, एपीआय (सायबर सेल)