नागपूर पोलीस उभी करणार आता कोविड योद्ध्यांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:55 PM2020-04-15T23:55:57+5:302020-04-15T23:57:43+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शहर पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शहर पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शहरातील विविध भागात प्रत्येकी पाच नागरिक कोविड योद्धा म्हणून नियुक्त करणार आहेत. ते विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार आहेत. या योद्ध्यांकडून सामाजिक जनजागरण करून घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जाहीर केले आहे.
यासंबंधाने पोलीस आयुक्त उपाध्याय यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, लॉकडाऊन अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी आम्ही विविध जाती समुदायातील नागरिकांना सहभागी करून घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून जनजागरण करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, असा या योजनेमागचा उद्देश आहे.
त्यानुसार आता प्रत्येक पोलीस ठाण्यात सहा ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावले जाणार आहे. एक पोलीस आणि एक नागरिक असे दोघे या ऑटोत बसून विविध झोपडपट्ट्या, गर्दीचे स्थान, बाजारपेठा, बँका आधी ठिकाणी ऑटो उभा करून लाऊडस्पीकरने जनजागृती करतील. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बीट (पथक) तयार करण्यात येईल. या बीटमध्ये पाच नागरिक नियुक्त केले जाणार असून त्यांना कोविड योद्धा म्हणून विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जाही दिला जाणार आहे. हे कोविड योद्धे त्यांच्या त्यांच्या समाजात जनजागरण करून नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याचे आणि एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे आवाहन करतील. कोविड योद्धे कोरोनाचे धोकेही समजावून सांगतील. योजने नुसार, या सर्वांना जवानांची कॅप आणि शिटीही दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान ३० ते ३५ कोविड योद्धे नियुक्त केले जातील. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी वाढविण्यात येईल.
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून नागपूर शहराची देशात ओळख आहे. कोरोना ही एक लढाई आहे. ही लढाई आपण सर्व जण मिळून लढणार आहोत आणि कोरोनावर मात करणार आहोत.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोलीस आयुक्त, नागपूर.