नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 09:26 PM2023-06-14T21:26:18+5:302023-06-14T21:27:06+5:30
Nagpur News पोलिस कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी होणार आहे. यासाठी नागपूर पोलिस दलाने पुढाकार घेतला असून, या तपासणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय डाटा डिजिटली साठविण्यात येणार आहे.
नागपूर : ऊन,पाऊस,वारा यांची पर्वा न करता अगदी सणासुदीच्या दिवशीदेखील बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक पोलिसांना मधुमेह, रक्तदाब, मानसिक ताणतणाव यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते व त्यातून काही जणांचा अकाली मृत्यूदेखील ओढवतो. हीच बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांप्रमाणेच आता कर्मचाऱ्यांचीदेखील सखोल वैद्यकीय तपासणी होणार आहे. यासाठी नागपूर पोलिस दलाने पुढाकार घेतला असून, या तपासणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय डाटा डिजिटली साठविण्यात येणार आहे.
कामाच्या धकाधकीत पोलिसांना आरोग्य तपासणी करायला वेळच मिळत नाही. जर वेळ मिळाला तर या तपासण्यांचा खर्च खूप जास्त असल्याने कर्मचारी टाळाटाळ करतात. मात्र, पोलिसांचे आरोग्य बिघडत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सेवेवर होतो. आयपीएस अधिकाऱ्यांची शासनाकडून नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याच धर्तीवर नागपूर पोलिस दलातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचीदेखील आरोग्य तपासणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्याची सखोल वैद्यकीय चाचणी याअंतर्गत करण्यात येत आहे.
एका क्लिकवर मिळणार आरोग्याची माहिती
प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तपासणीचा रेकॉर्ड डिजिटली स्टोअर करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात कर्मचारी कुठेही कर्तव्यावर असले व आरोग्याची काही समस्या जाणवली तर त्यांचा रेकॉर्ड एका क्लिकवर संबंधित डॉक्टरला उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप शिंदे यांनी दिली. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.
तणाव असलेल्या कर्मचाऱ्यांचे ‘सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन’
या तपासण्यांदरम्यान कर्मचाऱ्यांचे ‘सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन’देखील करण्यात येत आहे. यात तणाव असलेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशनदेखील करण्यात येत आहे. रक्त, लघवी, ईसीजी, एक्सरे, इको, इएनटी यासारख्या चाचण्यादेखील करण्यात येत आहे. दररोज ठरावीक संख्येत कर्मचारी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहेत.