नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:54 PM2019-02-19T21:54:51+5:302019-02-19T21:57:09+5:30
वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १ फेब्रुवारी २०१९ रोजी देय मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीत असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १ लाख ७६ हजार ९७९ वीज ग्राहकांकडे सुमारे ७० कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी होती; यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही.महावितरणने सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण राज्यभर सुरू केलेल्या केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे बिलिंगची संपूर्ण प्रक्रिया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असल्याने, थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोजा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाडा खेचणे तारेवरची कसरत ठरत आह. वीज खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्कम खर्च होत होती. यामुळे देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने १०० टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसुली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेत आतापर्यंत ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शून्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारित करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सूचना प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महावितरणच्या या विशेष मोहिमेत चालू महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७६ हजार ९७९ थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी ७३ हजार ९९५ ग्राहकांकडून १६ कोटी २८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर ७,००४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि ४,२३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यापैकी २,०६५ ग्राहकांनी रीतसर पुनर्जोडणी शुल्क आणि थकबाकीचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे. उर्वरित थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यातही नागपूर परिक्षेत्रातील तब्बल १६ हजार ७६२ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने या मोहिमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे सुरू केली असून, ग्राहकांनी देय मुदतीच्या आत नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.