नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 08:45 PM2020-02-28T20:45:05+5:302020-02-28T20:45:58+5:30
महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.
नियमानुसार महावितरण आठवड्यातून एक दिवस मेन्टेनन्ससाठी वीज पुरवठा बंद ठेवू शकते. परंतु एकाच ठिकाणी वारंवार वीज बंद ठेवू नये, असाही नियम आहे. परंतु महावितरण आता हा नियम स्वत:च तोडत आहे. यासाठी आठवड्याच्या दुसरा दिवस म्हणून रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. १ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणेशनगर फीडर, जुना बगडगंज फीडरशी जुळलेल्या परिसरात वीज बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान या परिसरात भूमिगत वीज लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याचप्रकारे एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटविण्यासाठी सुद्धा रविवार १ मार्च रोजी सुभेदार ले-आऊट, आशीर्वादनगर परिसरात सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.
वीज खांब हटविण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याची बाब तर्कसंगत आहे. परंतु यासाठी मनपासोबत समन्वय साधावा लागतो. तसेच हे काम उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशावर होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणला नाईलाजास्तव एकापेक्षा जास्त दिवस हे काम करावे लागते. परंतु भूमिगत लाईन टाकण्याचे काम मेंटेनन्स अंतर्गत येते. त्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे काम रविवारी केल्याने महावितरणमध्येही नाराजी आहे. कंपनीचे अधिकारी म्हणतात की, आता पाच दिवसाचा आठवडा झाला आहे. शनिवार-रविवारी बहुतांश कर्मचाऱ्यांची सुटी राहील.
केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारे फिल्डमध्ये काम करणारे कर्मचारी तैनात राहतील. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना मेंटनन्ससाठी रविवारी सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहे. रविवारी वीज पुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांनाही सुटीच्या दिवशी विजेविना राहावे लागेल. दुसरीकडे महावितरणने म्हणणे आहे की, उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नेटवर्क योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यावर भर दिला जात आहे.
वीज तर जातच आहे
मेंटनन्सचा मुख्य उद्देश अखंडित वीज पुरवठा करणे होय. परंतु दर आठवड्यात अनेक तास वीज बंद ठेवल्यानंतरही अधूनमधून वीज जाण्याचे प्रकार बंद झालेले नाही. दहा मिनिटे ते अर्धा तासापर्यंत वीज बंद राहणे ही नेहमीचच बाब झाली आहे. अशा परिस्थितीत मेंटनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.