नागपुरात गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:24 PM2019-05-14T23:24:09+5:302019-05-14T23:25:12+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका युवकाने गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका युवकाने गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. लग्नाच्या सहा महिन्याच्या आत ही घटना घडल्याने पत्नीच्या कुटुंबाला धक्काच बसला आहे. ही घटना मानकापूर झिंगाबाई टाकळी परिसरातील आहे. मृताचे नाव दीपाली ऊर्फ रोशनी राऊत (३०) व आरोपीचे नाव योगेश राऊत (३५) आहे.
योगेश हा मानवतानगर येथे राहतो. तो मार्केटिंग रिप्रझेंटेटिव्ह आहे. दीपाली ही एसटीमध्ये कंडक्टर होती. ती यवतमाळच्या पांढरकवडा डेपोत कार्यरत आहे. योगेशचे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये झाले होते. दीपाली चार-पाच महिन्याची गर्भवती सुद्धा आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर दोघांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला होता. योगेश हा दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिच्या पोटातील गर्भ माझा नसल्याचे तो सांगत होता. दीपाली पांढरकवडा येथे किरायाने राहत होती. तिला मित्रांचे फोन येत होते. त्यामुळे योगेशचा संशय आणखी वाढला होता. तो दीपालीला फोन करणाऱ्याच्या संबंधाबाबत विचारणा करीत होता.
संशय व्यक्त करण्यात येतो की, ११ मे रोजी दुपारी नायलॉनच्या दोरीने योगेशने तिच्या गळ्याला फास लावला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केले. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास योगेशच्या वडिलानी त्याला आवाज दिला. तेव्हा अस्वस्थ अवस्थेत योगेशने दरवाजा उघडला आणि तो बेहोश झाला. त्याच्या बाजूलाच दीपाली पडलेली होती. वडिलांनी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दीपालीला मृत घोषित केले तर योगेशला मेडिकलमध्ये भरती केले. योगेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या सूचनेनुसार दीपालीचे वडील अशोक होरे नागपुरात पोहचले. अशोक होरे यांच्या तक्रारीवर मानकापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. दीपालीच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे मंगळवारी पोलिसांनी दीपालीच्या वडिलांच्या तक्रारीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. घटनेचे नेमके कारण योगेशला शुद्ध आल्यानंतरच कळेल. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे.