नागपूर प्राईड मार्च! सामाजिक समतेच्या हक्कासाठी समलैंगिकांसोबत उभे ठाकले सामान्यजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 10:18 PM2023-01-07T22:18:35+5:302023-01-07T22:19:04+5:30
Nagpur News समलैंगिकांसोबत सामाजिक गैरवर्तन होऊ नये आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने सारथी ट्रस्टच्या वतीने शनिवारी आरबीआई चाैकातून नागपूर प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर : समलैंगिकांसोबत सामाजिक गैरवर्तन होऊ नये आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने सारथी ट्रस्टच्या वतीने शनिवारी आरबीआई चाैकातून नागपूर प्राईड मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
हमसफर ट्रस्ट आणि केशवसुरी फाउंडेशनच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात समलैंगिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये शहरातील आठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्थांनीही सहभाग घेतला होता. संविधान चौकातून हा मार्च निघाला. एलजीबीटीक्यूचा एक मोठा फ्लॅग हाती धरून तरुण तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी व नागरिकांना आवाहन करण्यासाठी फेरी काढली. ही फेरी व्हरायटी चौक-झाशी राणी चौकापर्यंत जाऊन पुन्हा संविधान चौकात आली.
यावेळी अनेक तरुण तरुणींनी आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले.
या मार्चसाठी सारथी ट्रस्टचे संस्थापक आनंद चंद्राणी, सीईओ निकुंज जोशी, मोहिनी, अंशुल शर्मा, विद्या कांबळे, डॉ. सुरभी मित्रा यांच्यासह अनेक समलैंगिक तरुण तरुणी उत्साहाने सहभागी झाले होते.
सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिला उत्स्फूर्त पाठिंबा
समलैंगिक तरुण तरुणींच्या सामाजिक समतेला पाठिंबा द्यायला नागपुरातील आठ महाविद्यालयातील तरुण तरुणी व अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.