Nagpur: पुण्यातील अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती? तो अपघात की घातपात, बनवाबनवीचा संशय
By नरेश डोंगरे | Published: May 30, 2024 09:16 PM2024-05-30T21:16:30+5:302024-05-30T21:18:02+5:30
Nagpur Accident News: दोन महिलांना बेदरकारपणे उडवून पळणाऱ्या कारचालकाचा गिट्टीखदान पोलिसांना तब्बल तीन आठवडे शोध लागला नाही. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी कार शोधून काढली अन् आरोपी (?) म्हणून एका तरुणाला ताब्यातही घेतले.
- नरेश डोंगरे
नागपूर - दोन महिलांना बेदरकारपणे उडवून पळणाऱ्या कारचालकाचा गिट्टीखदान पोलिसांना तब्बल तीन आठवडे शोध लागला नाही. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी कार शोधून काढली अन् आरोपी (?) म्हणून एका तरुणाला ताब्यातही घेतले. दरम्यान, पोलिसांची या अपघातातील भूमीका पुण्यातील बहुचर्चित प्रकरणासारखीच प्रचंड संशयास्पद ठरली आहे. हे अपघाताचे नव्हे तर घातपाताचे प्रकरण असल्याचा दाट संशयही एकूण घटनाक्रमामुळे निर्माण झाला आहे.
७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या सुमारास ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघी मॉर्निंग वॉक करत असताना शिवाजी चाैकातील एका दुकानाजवळ मागून आलेल्या कार चालकाने ममता आणि वंदनांना जोरदार धडक दिली. या दोघी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्या. ते पाहून दोन तरुण कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, कार चालक बेदरकारपणे पळून गेला. अत्यंत गंभीर अवस्थेत ममता आणि वंदनांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून वारंवार उपचाराची मोठी रक्कम मागितली जात असल्याने पर्याय नसल्यामुळे अखेर ममता यांना नातेवाइकांनी अर्धवट उपचार करून घरी आणले. पैशाअभावी त्या आता वेदनांमुळे आक्रोश करीत मरणयातना सहन करीत आहेत.
'लोकमत'ने या संतापजनक प्रकरणाचे वृत्त बुधवारी, २९ मे च्या अंकात ठळकपणे प्रकाशित करून पोलिसांच्या भूमीकेसंबंधावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या गिट्टीखदान पोलिसांनी लगेच कारचा शोध लावला आणि आरोपी म्हणून एका तरुणाला ताब्यातही घेतले. दरम्यान, लोकमतचे वृत्त उचलून धरत अनेक वृत्तवाहिन्यांनीही या प्रकरणाचे वृत्त प्रसारित केल्याने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली.
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर तो अपघात नव्हे तर घातपाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट होते. आरोपी कारचालक पूर्ण प्रशस्त रस्ता मोकळा असताना अचानक कार वळवतो आणि रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर घालतो. त्यानंतर 'टार्गेट' पूर्ण झाल्याचे लक्षात येताच पळूनही जातो. दुसरीकडे गिट्टीखदान पोलिसांना तीन आठवडे कारचा नंबर मिळत नाही. मात्र, लोकमतने वृत्त प्रकाशित करताच काही वेळेतच कारचा नंबर अन् आरोपी कसा गवसतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नोटीस देऊन आरोपीला केले मोकळे
विशेष म्हणजे, पोलिसांनी बुधवारी दुपारी आरोपी म्हणून ज्या तरुणाला आणले, तो खरेच आरोपी आहे की डमी आहे, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. दुसरे म्हणजे, दोन महिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लगेच नोटीस देऊन कसे सोडले, असाही प्रश्न आहे. यात पोलिसांनी काही गैरप्रकाराचा अवलंब केला का, अशी शंका जखमींच्या नातेवाईकांकडून घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, याप्रकरणात आता नव्याने काही कलमे लावली जाण्याचे संकेत आहेत.
हे प्रकरण पुण्यासारखेच : अनिल देशमुख
दरम्यान, पुण्यातील हिट ॲन्ड रन प्रकरणासारखे नागपूर पोलीसही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. हे प्रकरण प्रचंड संतापजनक अन् संशयास्पद आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चाैकशी करून खरा आरोपी कोण तो शोधावे आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी. तसेच जखमी महिलांवर शासकीय खर्चाने उपचार करावे, अशी मागणी त्यांनी केली. देशमुख यांनी आज जखमी महिलेच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला.
आम्ही सर्वकश चाैकशी करतो आहे : डीसीपी मदने
या संबंधाने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या गुन्ह्यातील आरोपीला बुधवारी नोटीस देऊन सोडले होते. मात्र, चाैकशीनंतर आज त्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. घातपाताचा मुद्दा, आरोपी म्हणून उभा केलेला ड्रायव्हर तसेच आरोपींवर लावलेल्या जुजबी कलमा लक्षात घेता प्रकरणाची सर्वकश चाैकशी केली जात असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.