नागपूर-पुणे दुरांतो सुरूकरा
By admin | Published: January 7, 2016 03:45 AM2016-01-07T03:45:46+5:302016-01-07T03:45:46+5:30
नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो.
प्रवाशांची मागणी : प्रतीक्षायादी राहत असल्यामुळे गैरसोय
नागपूर : नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो. या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण फुल्ल झालेले आढळते. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेटींगचे तिकीट घेऊन प्रवास करण्याची पाळी येते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित माध्यम म्हणून प्रवाशी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु नागपूरवरून प्रतिदिवशी एकच रेल्वेगाडी पुण्यासाठी सोडण्यात येते. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी सोडण्यात येते. तर १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी सोडण्यात येते. या दोन्ही गाड्यात १२ महिने प्रवाशांची भली मोठी प्रतीक्षायादी पाहावयास मिळते. दोन महिन्यांपूर्वीच या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते.
नागपूरसह विदर्भातील असंख्य विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी गेलेले असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त राहतो. दिवाळीत नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ होते.
याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक नागपूर-पुणे प्रवासाचे भाडे तीन हजार करीत असल्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होते. या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस ही नवी गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)
दिल्ली, पुणे दुरांतोसाठी पाठपुरावा करणार
‘नागपूरवरून दिल्लीला तसेच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावर नागपुरातून दुरांतो गाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. याबाबत आगामी रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून या गाड्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी आग्रह करणार आहे.’
अजय संचेती,
खासदार, राज्यसभा