नागपुरात टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:21 PM2017-12-06T23:21:11+5:302017-12-06T23:22:25+5:30
कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी पार्लरचे संचालक पवन मोरयानीला अटक करून हुक्क्याचे सामान जप्त केले आहे. कमाल चौकात साईनाथ अपार्टमेंट आहे. पोलिसांना अपार्टमेंटच्या टेरेसवर फिरंगी रेस्टॉरंटच्या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री तेथे धाड टाकली. तेथे पवन मोरयानी ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देताना आढळला. पोलिसांनी पार्लरमधून हुक्क्याचे सामान जप्त करून पवनला अटक केली. पवनही साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने काही दिवसांपूर्वी हुक्का पार्लर सुरू केले होते. पवन यापूर्वी जुगार अड्ड्यावर पकडल्या गेला होता. पोलिसांना त्याच्या हुक्का पार्लरमध्ये चर्चेत असलेले लोक सापडण्याची अपेक्षा होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकनीकर, सहायक पोलीस आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नरेंद्र हिवरे, रवींद्र दुबे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे आणि सहकाऱ्यांनी पार पाडली.