नागपुरात कुख्यात राजपूतच्या सट्टा व जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:13 AM2019-02-02T00:13:47+5:302019-02-02T00:17:19+5:30

एकाच ठिकाणी मटका तसेच जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या कुख्यात विजय राजपूतच्या अड्ड्यावर परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सिनेस्टाईल छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी ३० जुगारी तसेच जुगार अड्डा चालविणारे त्याचे दोन साथीदार जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख, मोबाईल तसेच मोटरसायकलींसह २ लाख, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य आरोपी राजपूत मात्र पळून गेला.

In Nagpur, raid on notorious Rajput satta and gambling den | नागपुरात कुख्यात राजपूतच्या सट्टा व जुगार अड्डयावर छापा

नागपुरात कुख्यात राजपूतच्या सट्टा व जुगार अड्डयावर छापा

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जुगारी, दोन साथीदार अडकलेरोख, मोबाईलसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच ठिकाणी मटका तसेच जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या कुख्यात विजय राजपूतच्या अड्ड्यावर परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सिनेस्टाईल छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी ३० जुगारी तसेच जुगार अड्डा चालविणारे त्याचे दोन साथीदार जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख, मोबाईल तसेच मोटरसायकलींसह २ लाख, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य आरोपी राजपूत मात्र पळून गेला.
इमामवाड्यातील कुंदनलाल गुप्ता वाचनालयाजवळ कुख्यात राजपूतचे घर आहे. तो घरातच अनेक दिवसांपासून बिनबोभाट मटका आणि जुगार अड्डा चालवितो. पोलिसांशी मैत्री असल्यामुळे त्याच्या अड्ड्यावर कधीच छापा पडत नाही. दिखाव्यासाठी पोलीस आले तरी कारवाईच्या नावाखाली जुजबी कारवाई होते. हे माहीत असल्याने राजपूतच्या अड्ड्यावर मटका आणि जुगार शौकिनांची रोजच मोठी गर्दी असते. ही माहिती कळाल्याने पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी तेथे कारवाईसाठी व्यूहरचना केली. इमामवाडा, सक्करदरा आणि हुडकेश्वरचा पोलीस ताफा आपल्या कार्यालयात बोलवून घेतल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास राजपूतच्या अड्ड्यावर छापा घालण्यात आला. चोहोबाजूने गराडा घालूनही पोलिसांच्या ताब्यातून मुख्य आरोपी राजपूत तसेच ५० पेक्षा जास्त जुगारी पळून गेले. पोलिसांनी तेथे ३० जणांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे राजपूतचे साथीदार छगन पौनीकर (वर्धमाननगर) आणि नरेंद्र गिºहे (झिंगाबाई टाकळी) या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख ११ हजार, ३० मोबाईल तसेच १० मोटरसायकल असा एकूण २ लाख, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सहायक आयुक्त घार्गे, इमामवाडाचे ठाणेदार रमाकांत दुर्गे, उपनिरीक्षक नरवाडे, पाटवदकर, कावरे (हुडकेश्वर), शिपायी रमण खैरे, नितीन ठाकरे आदींचा सहभाग होता.
दोन पोती चिठ्ठ्या जप्त
कुख्यात विजय राजपूत याच्या अड्ड्यावर पोलिसांनी दोन पोत्यात मावेल एवढ्या चिठ्ठ्या (मटक्याच्या नोंदी असलेल्या) सापडल्या. यावरून जुगार आणि सट्टा खेळणारांची किती गर्दी राहत असेल, याचा अंदाज येतो. राजपूत याचे अनेक ठिकाणच्या पोलिसांशी मधूर संबंध आहे. त्यामुळे त्याला कारवाई होण्यापूर्वीच माहिती मिळते. आजच्या कारवाईचीही त्याला कुणकुण लागली असावी, म्हणूनच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला असावा, असे मानले जाते.

Web Title: In Nagpur, raid on notorious Rajput satta and gambling den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.