पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे प्रशासन सज्ज, 'वंदे भारत' ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील
By नरेश डोंगरे | Published: December 9, 2022 08:37 PM2022-12-09T20:37:23+5:302022-12-09T20:37:42+5:30
रेल्वे पोलीस, आरपीएफ अलर्ट: रेल्वेस्थानकाला सुरक्षेचे कवच
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला ऐतिहासिक नागपूर रेल्वेस्थानकावर येत आहेत. त्यांचा कार्यक्रम आणि स्वागतासाठी अवघे रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ही अलर्ट मोडवर आले असून त्यांनी रेल्वे स्थानक तसेच परिसराला सुरक्षेचे कवच घातले आहे.
पंतप्रधान मोदी रविवारी, ११ डिसेंबरला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नागपूर दाैऱ्यावर येत आहेत. नागपूर बिलासपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत या अतिवेगाच्या रेल्वेगाडीला ते नागपूर रेल्वेस्थानकावरून हिरवी झेंडी दाखवणार आहेत. सकाळी ९.४० ते ९.५५ असा १५ मिनिटांचा हा दाैरा आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. रेल्वेस्थानक आणि परिसराची साफसफाई, डागडूजी आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. फलाट क्रमांक १ वर हा कार्यक्रम होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने फलाटाच्या छतावर मंडपासारखे आच्छादन केले आहे. फलाट झाडून पुसून स्वच्छ करण्यात आले असून रेल्वेलाईनलाही (रुळ तसेच सिमेंटच्या फळ्या) लाल पांढरा रंग लावण्यात आला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करणार आहेत.
पाच बॉम्ब शोधक आणि नाशक पथके सज्ज
एकीकडे रेल्वे प्रशासनाने स्वागताची तयारी चालविली असतानाच रेल्वे पोलीस तसेच सुरक्षा दलानेही खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. रेल्वे पोलिसांचे २२ अधिकारी, २१० कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे १५० अधिकारी कर्मचारी रेल्वे तसेच रेल्वेस्थानकाच्या आतमधील सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत. त्यासाठी नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथील ५ बॉम्ब शोधक आणि नाशक पथके (बीडीडीएस) सज्ज करण्यात आली आहेत. बीडीडीएसचे श्वान रात्रंदिवस रेल्वेस्थानक आणि परिसराचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. त्यासंबधाने नागपूर रेल्वेचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन बंदोबस्ताची रुपरेषा समजावून सांगितली.
आज होणार रंगित तालिम
रेल्वेस्थानक परिसरात रविवारी ज्या वेळेला येणार त्याच वेळेला शनिवारी सकाळी रंगित तालिम (रिहर्सल) घेतली जाणार आहे. रेल्वेस्थानकाच्या बाहेरच्या चोहोबाजूचा परिसर सील केला जाणार आहे. त्यासाठी शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. टेकडी मंदीर, मानस चाैक, कस्तुरचंद पार्क, जयस्तंभ चाैक, रामझुला, संत्रा मार्केट अशा चारही बाजुने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.