नागपुरात रेल्वेच्या ६५.६८ लाखांच्या ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:19 PM2018-10-22T17:19:07+5:302018-10-22T17:20:24+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करीत ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला मानेवाडा परिसरातून अटक करीत त्याच्याकडून १.६० लाख रुपये किमतीचे ६५ आरक्षणाचे लाईव्ह तिकिटासह ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वे सुरक्षा दलाने कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, दीपक वानखेडे, निळकंठ गोरे, किशोर चौधरी, अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी अजनी पोलिसांना सोबत घेऊन बालाजीनगर, मानेवाडा रोड येथील आर. पी. टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानात धाड टाकली. तेथे दुकानात मालक शत्रुघ्न सूरज सिंह (३८) रा. बालाजीनगर हा उपस्थित होता. दुकानात १ कॉम्प्युटर, २ लॅपटॉप, राऊटर आढळले. वेगवेगळ््या नावाचे २१२ फेक आयडीवरून रेड मिर्ची, मॅक तात्काल अॅपद्वारे काढलेली रेल्वे आरक्षणाची ६५ तिकिटे आढळली. त्याची किंमत १ लाख ६० हजार ८७८ रुपये आहे. प्रवाशांकडून प्रति तिकिटावर २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन ई तिकीट विकत असल्याची माहिती आरोपीने दिली. आरपीएफला संबंधित दलालाने मागील दोन महिन्यात अवैधरीत्या काढलेले ८६० आरक्षणाची तिकिटे किंमत १८ लाख ८६ हजार ९६५ रुपयांची तिकिटे विकल्याची माहिती समजली. दोन महिन्यांपूर्वी यापेक्षा अधिक तिकिटे आरोपीने काढली असावीत असा अंदाज आहे. याशिवाय व्हिवो कंपनीचा मोबाईल किंमत १३ हजार, रोख ९३०० रुपये असा एकूण १.३० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या दुकानात एक रजिस्टर आढळले. त्यात २०१६ ते २०१७ दरम्यान १९०० रेल्वे आरक्षणाची तिकिटे काढल्याची माहिती आढळली. या तिकिटांची किंमत ४३ लाख ८२ हजार ७४६ रुपये आहे. कारवाईत जप्त केलेली आरक्षणाची ६५ तिकिटे, ८६० मागील दोन महिन्यातील तिकिटे आणि १९०० ई तिकिट काढल्याचे रजिस्टर असे एकूण ६५.६९ लाखाच्या २८२५ तिकिटांचा काळाबाजार आरपीएफने उघडकीस आणला आहे. आरपीएफने आरोपीविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.