नागपूर रेल्वेस्थानक होणार वर्ल्ड क्लास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:02 AM2018-02-02T00:02:17+5:302018-02-02T00:03:45+5:30
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली असल्याचा अंदाज आहे. अजनी रेल्वेस्थानकावर अर्थमंत्र्यांची कृपादृष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजनी रेल्वेस्थानकाला मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड हब बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक निधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूर आणि अजनीशिवाय वर्धा, गोंदिया रेल्वेस्थानकावर स्वयंचलित पायऱ्या (एस्केलेटर), सीसीटीव्ही कॅमेऱ्या साठी निधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय माजरी, गोधनी, खापरी रेल्वेस्थानकांना आदर्श स्थानक बनविण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा देण्यासाठी पुरेसा निधी मिळणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच इतवारी-छिंदवाडा, इतवारी-नागभीड ब्रॉडगेज, वडसा-देसाईगंज ब्रॉडगेज प्रकल्पाव्यतिरिक्त नागपूर-वर्धा थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रात्रीपर्यंत अपलोड झाले नाही पिंकबुक
मागील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तासाभरात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींबाबतचे पिंकबुक इंटरनेटवर अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे नागपूरसह विदर्भाला काय मिळाले, याची माहिती कळली. परंतु यावर्षी पिंकबुक अपलोड झाले नसल्यामुळे रेल्वे अधिकारी आणि पत्रकार सायंकाळी उशिरापर्यंत पिंकबुकची वाट पाहत बसले होते.
५ फेब्रुवारीला स्पष्ट होणार स्थिती
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारीपर्यंत पिंकबुक येणार आहे. त्यानंतरच मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला कोणत्या नव्या योजना आणि निधी मिळाला, हे स्पष्ट होणार आहे.
दुरांतो, विदर्भ, सेवाग्राममध्ये सीसीटीव्ही
अर्र्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार आता नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेससह सर्व गाड्यात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.