नागपूर रेल्वे स्थानक : ओएचई तारेमुळे जळून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 09:18 PM2019-04-09T21:18:34+5:302019-04-09T21:19:40+5:30
रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
राहुल भीमसेन छनकवानी (२६) रा. सिंधी कॉलनी, दुर्ग असे मृत युवकाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा वडिलांसह कोरबा एक्स्प्रेसने नागपूर ते दुर्ग असा प्रवास करीत होता. मात्र, वडिलाची नजर चुकवून तो गाडीखाली उतरला. वडिलांना तो गाडीतच असल्याचे वाटले. त्यानंतर राहुल प्लॅटफार्म क्रमांक ८ कडे गेला. येथे यार्डमध्ये किलोमीटर क्रमांक ८३६/१९ च्या शेजारी रेल्वे रुळाची ४ आणि ५ क्रमांकाची लाईन आहे. ४ क्रमांकाच्या लाईनवर पेट्रोलच्या वॅगन उभ्या होत्या तर ५ क्रमांकाच्या लाईनवर कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. दरम्यान राहुल पेट्रोलच्या वॅगन क्रमांक डब्ल्यू. आर. ४००८९१६६५०१ वर वॅगनवर चढला. त्याच वेळी त्याला ओएचई तारेचा जोरदार धक्का बसला. ओएचई तारेमुळे त्याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यात तो डोक्याच्या भारावर पडल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त बाहेर येत होते. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक मनीष गौर, राजू इंगळे, रोकडे, दत्ता गाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी रेल्वे डॉक्टर आणि लोहमार्ग पोलिसांनाही पाचारण केले. रेल्वे डॉक्टरांनी घटनास्थळ गाठून राहुलला मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परमानंद वासनिक करीत आहेत.
मोबाईलवरून पटली ओळख
ओएचई तारेला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, डॉक्टर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत युवक कोण आहे याबाबत पोलिसांना काहीच माहीत नव्हते. पोलीस त्याची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवर नातेवाईकांचा फोन आला. यावरून मृत राहुलची ओळख पटली. लोहमार्ग पोलिसांनी नातेवाईकांकडून राहुलचे वडील आणि बहिणीचा मोबाईल क्रमांक मिळविला. राहुलचे काका नागपुरात वेकोलीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लगेच नागपूर रेल्वेस्थानक गाठले. राहुल वडिलांसोबत घरी का गेला नाही. याचे उत्तर पोलीस तपासानंतर मिळणार आहे.