नागपूर रेल्वेस्थानक : वर्षभरानंतरही फूट ओव्हब्रिजचे काम थंडबस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:55 AM2018-12-09T00:55:26+5:302018-12-09T00:57:50+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दाटीवाटीने अरुंद पुलावरून ये-जा करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वरून एक अरुंद असलेला फूट ओव्हरब्रिज (एफओबी) प्लॅटफार्म क्रमांक ६ कडे जातो. हा फूट ओव्हरब्रिज रुंद करण्याच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु अद्याप या एफओबीचे काम सुरू झाले नसून प्रवाशांना दाटीवाटीने अरुंद पुलावरून ये-जा करावी लागत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या इटारसी एण्डकडील भागात जुना फूट ओव्हरब्रिज असून तो प्लॅटफार्म क्रमांक ७ पर्यंत आहे. या फूटओव्हरब्रिजच्या ठिकाणी प्लॅटफार्म क्रमांक ८ पर्यंत जाणाऱ्या फूट ओव्हरब्रिज रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी मान्यता दिली. त्यासाठी मागील वर्षी निविदा प्रक्रियाही पार पडली. परंतु वर्षभरात या फूट ओव्हरब्रिजचे इंचभरही काम झाले नाही. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा फूट ओव्हरब्रिज तयार करण्यासाठी ९ कोटी रुपयांचे कंत्राट वर्षभरापूर्वी देण्यात आले. या कामात लिफ्ट लावण्याची तरतूदही आहे. मुंबईच्या कंत्राटदाराने नागपूर रेल्वे विभागाच्या प्रशासनाला पुलाचे ड्रॉईंग सोपविले. त्यास मुंबई मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु हे ड्रॉईंग येथे पास न होता परत संशोधनासाठी नागपूरला पाठविण्यात आले. कंत्राटदाराने पुन्हा संशोधित ड्रॉईंग मुख्यालयात पाठविले. परंतु पुन्हा ते नामंजुर करण्यात आले. तेंव्हापासून ड्रॉईंग पाठविण्याचे आणि ते नामंजूर करण्याचे कामच सुरु असल्यामुळे फूट ओव्हरब्रिजचे काम रखडले आहे. यात संबंधित कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी कमी बोली लावून कंत्राट मिळविले आहे. आता बांधकामाचे साहित्य आणि मजुरांच्या मजुरीत वाढ झाल्यामुळे तो सुद्धा काम करण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.
लिफ्टचे कामही अपूर्ण
नव्या फूट ओव्हरब्रिजसोबत इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १, २/३, ४/५, ६/७ आणि ८ वर एकूण ५ लिफ्ट लावण्यात येणार होत्या. परंतु याचे कंत्राट देऊन वर्ष उलटल्यानंतरही एकही लिफ्ट लावण्यात आली नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.