नागपूर रेल्वेस्थानक; चार कोटींचे काम, दिला एक रुपया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:14 AM2019-07-11T11:14:02+5:302019-07-11T11:17:10+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होण्याची परिस्थिती .
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यात दरवर्षी नागपूर रेल्वेस्थानकावर पाणी साचते. रेल्वे रुळावर दोन ते तीन फूट पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होतात. पाणी बाहेर निघण्यासाठी मार्गच नसल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे १८०० मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यासाठीचे काम रेल्वेच्या पिंकबुकमध्ये समाविष्ट करण्यात आले. या कामासाठी एकूण खर्च ४ कोटी ४१ लाख रुपये येणार आहे. परंतु या कामासाठी पिंकबुकमध्ये केवळ एक रुपयाची तरतूद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना न झाल्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वेगाड्या ठप्प होणार आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर साचणारे पाणी बाहेर काढण्याची ब्रिटिशकालीन व्यवस्था आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भाग उंचीचा आहे. यामुळे येथे नेहमीच पाणी साचते. मागील आठ वर्षांपासून यासाठी उपाययोजना करण्यासाठी विभाग पातळीवर चर्चा सुरू आहे. परंतु आतापर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. हीच स्थिती राहिली आणि मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वेगाड्या रेल्वे रुळावरच ठप्प होतील. यादृष्टीने रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडून पूर्वेकडील भागात १८०० मिलीमीटर पाईपलाईन टाकण्याची योजना आहे. आश्चर्य म्हणजे रेल्वेस्थानकावर, प्लॅटफार्मवर गरज नसताना विकासकामे करण्यात येत आहेत. परंतु पावसाळ्यात रेल्वेगाड्या ठप्प होत असताना पाणी बाहेर काढण्यासाठी विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जोरात पाऊस आल्यानंतर रेल्वेगाड्या ठप्प होण्याशिवाय रेल्वे प्रशासनाला आणखी नुकसान होऊ शकते. यात रेल्वेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होऊ शकतात. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होणे हे तर क्रमप्राप्त आहे. एवढी गंभीर समस्या असताना याबाबत रेल्वेच्या संबंधित विभागाने कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पुन्हा रेल्वे रुळावर पाणी साचून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे, हे विशेष.
पश्चिमेकडील भागात होणार तलाव
पावसाचे पाणी रेल्वेस्थानकाच्या बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास पश्चिमेकडील भागात नेहमीच तलाव होतो. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणे शक्य होत नाही. लोहमार्ग पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पाणी साचते. याशिवाय पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी पाण्यात बुडतात. रेल्वे प्रशासनाने पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही.
दुसऱ्या शीर्षकाखाली घेतला असेल खर्च
‘रेल्वेस्थानकावरील पाणी बाहेर काढण्याच्या कामासाठी पिंकबुकमध्ये संबंधित शीर्षकाखाली एक रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या कामासाठी दुसऱ्या शीर्षकाखाली खर्चाची तरतूद करण्याची शक्यता आहे.’
-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, नागपूर विभाग
मुसळधार पावसामुळे तीन वर्षांपूर्वी रेल्वे रुळ असे पाण्याखाली बुडाले होते. रेल्वेस्थानकावरील पाणी बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.