नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:25 PM2018-03-05T23:25:54+5:302018-03-05T23:26:13+5:30
नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोयीसुविधा राहतील, याबाबत आठवडाभरात चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोयीसुविधा राहतील, याबाबत आठवडाभरात चित्र स्पष्ट होणार आहे.
रेल्वे स्थानकाला होणारे उत्पन्न आणि रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या संख्येनुसार त्या रेल्वे स्थानकाचा दर्जा ठरविला जातो. दर पाच वर्षांनी त्याची चाचपणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१८ मध्ये नागपूर रेल्वे स्थानकाला हा दर्जा मिळाला आहे. यापूर्वी नागपूर स्थानकाला ए-१ चा दर्जा देण्यात आला होता. त्यानुसार सोयीसुविधात वाढ करण्यात आली होती. आता एनएसजी-२ म्हणजे ‘नॉन सबरबन ग्रुप’मध्ये नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. ज्या रेल्वे स्थानकावरून लोकल गाड्या चालतात त्या स्थानकाचा सबरबनमध्ये समावेश होतो. नागपूर रेल्वे स्थानकाहून लोकल गाड्या चालविण्यात येत असल्यामुळे नागपूरचा समावेश नॉन सबरबन ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. तसेच १०० ते ५०० कोटी रुपये उत्पन्न देणाºया स्थानकांचा एनएसजी-२ मध्ये समावेश केला जातो. एकट्या नागपूर रेल्वे स्थानकातून वर्ष २०१६-१७ मध्ये ३३५.३९ कोटी रुपयांच्या रेल्वे तिकिटा विकण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रृजेश कुमार गुप्ता यांच्या पुढाकाराने नागपूर स्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे. रेल्वे स्थानकावर नागपूरसह आजूबाजूच्या पर्यटनस्थळांचे दर्शन घडविणाºया कलाकृती दाखविण्यात आल्या आहेत. याशिवाय गार्डन आणि आॅर्ट गॅलरीही तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्लॅटफार्मवर एस्क्लेटर (स्वयंचलित जिना) कामही सुरू आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून एनएसजी-२ दर्जा मिळाल्यानंतर या सुविधात आणखी वाढ होणार आहे.
चित्र स्पष्ट होताच विकास कामांना गती
‘नागपूर रेल्वे स्थानकाला पूर्वी ए-१ दर्जा देण्यात आलेला होता. रेल्वे मंत्रालयाने या दर्जात वाढ करून आता ‘एनएसजी-२’ हा दर्जा दिला आहे. नव्या दर्जानुसार रेल्वे स्थानकावर कोणत्या सोयीसुविधा, बदल करावयास हवेत, हे स्पष्ट झाल्यानंतर विकास कामांना गती देण्यात येईल.’
ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग