नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर
By नरेश डोंगरे | Published: December 2, 2023 04:34 PM2023-12-02T16:34:18+5:302023-12-02T16:35:06+5:30
प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे.
नागपूर : येथील रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासाच्या कामांची गाडी चांगलीच गतीमान झाली आहे. एकूण ४८७.८८ कोटींची ही कामे असून त्यातील बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत.
रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कामांपैकी वेस्ट साइड केबल शिफ्टिंग, माती तपासणी, साइट लॅब चालू करणे, बॅचिंग प्लांटची बांधणी, पूर्व बाजूची युटिलिटी शिफ्टिंग, वाहतूक वळवण्यासाठी नवीन प्रवेश / निर्गमन, पार्किंग क्षेत्र बदलणे आणि व्हील वॉशिंग युनिटची उभारणी ईत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. तर, तळघरातील स्लॅबचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण केले जात आहे. त्याचप्रमाणे ग्राउंड लेव्हल स्लॅब शटरिंगचे काम आणि उत्खनन तसेच पाया भरणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी कळविले आहे.
विशेष म्हणजे, नागपूर येथील मुख्य रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश असून, त्यानुसार या स्थानकाच्या आत आणि बाहेर विविध विकास कामे करून रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलवण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे.
'वर्ल्ड क्लास स्टेशन'
दुसरे म्हणजे, अजनी रेल्वे स्थानकाचा विकास आणि साैंदर्यीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. अजनी रेल्वे स्थानकाला 'वर्ल्ड क्लास स्टेशन' बनविण्याचे आधीच जाहिर झाले असून त्या संबंधाने आकर्षक डिझाईनही तयार झाले आहे. त्यानुसार, विविध कामे वेगाने केली जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरात अजनी रेल्वे स्थानकाच्या रुपाने एका आकर्षक वास्तूची भर पडणार आहे.