जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यात नागपूर रेल्वेस्थानक अव्वल स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 10:21 PM2023-06-02T22:21:21+5:302023-06-02T22:21:47+5:30
Nagpur News भारतीय रेल्वेच्या 'एनएसजी -२ रेल्वे स्थानकांच्या' श्रेणीत जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक म्हणून मध्य रेल्वेतील नागपूर स्थानकाने पहिला नंबर मिळवला आहे.
नागपूर : भारतीय रेल्वेच्या 'एनएसजी -२ रेल्वे स्थानकांच्या' श्रेणीत जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक म्हणून मध्य रेल्वेतील नागपूर स्थानकाने पहिला नंबर मिळवला आहे. यंदा नागपूर स्थानकाने जाहिरातबाजीतून थोडा थोडका नव्हे तर तब्बल १ कोटी ४६ लाखांचा महसूल प्राप्त केला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २/३, ४/५ आणि ६/७ वर गैर डिजिटल विभागात जाहिरातबाजी करण्यासाठी ई ऑक्शन करण्यात आले. त्यातून नागपूर स्थानकाला ७६ लाख, २० हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे गैर डिजिटल आणि डिजिटल (ड्युअल डिस्प्ले सिस्टम, टीव्ही, व्हिडिओ वॉल, जिंगल ॲन्ड, सार्वजनिक घोषणा प्रणाली, थ्रीडीएलईडी ग्लोब आणि ग्लो तसेच साईन बोर्ड) जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे एकूण उत्पन्न १ कोटी, ४६ लाखांचे झाले आहे.
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि वाणिज्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी नागपूर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग, उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. मध्य रेल्वेत 'एनएसजी-२'च्या श्रेणीत ७७ रेल्वेेस्थानकं आहेत. त्यात नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या सर्व स्थानकात सर्वाधिक जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्याचा मान नागपूर रेल्वेस्थानकाने मिळविला आहे.
प्रवासी, कमाई आणि दर्जा
विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची होणारी वर्दळ आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे भारतीय रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकांचे वर्गीकरण करते. अर्थात् एनएसजी -२ स्थानकाचा दर्जा त्या रेल्वेस्थानकाला मिळतो, ज्या स्थानकांवरून प्रवाशांच्या माध्यमातून १०० कोटी ते ५०० कोटींची वार्षिक कमाई (उत्पन्न) मिळते. वर्षाला १० मिलियनपेक्षा जास्त आणि २० मिलियनपेक्षा कमी प्रवाशांची संख्या ज्या रेल्वेस्थानकांवर गणली जाते, अशा रेल्वेस्थानकाला 'एनएसजी-२' चा दर्जा मिळतो.
-----